नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
चिंतनशील मनांना कधीकधी अगदी मूलभूत प्रश्न पडत असतात. ज्यांना नशिबाने कोणतेच सुख दिले नाही, सतत निराशा, वंचना, अपयशच सहन करावे लागले त्यांना अनेकदा वाटते की, आयुष्य ही एक शिक्षा तर नाही? देवाकडे त्यांचे गाऱ्हाणेही बिनतोड असते. ते म्हणतात, ‘आमच्या नशिबात फक्त दु:खच का? जीवन हीच एक शिक्षा ठरावी असा कोणता अपराध आम्ही केला आहे, ते तरी सांग!
मनापासून प्रयत्न करूनही काहींना कुणी आयुष्यभर समजूनच घेत नाही, कशातही यश येत नाही, मग एकाकीपण असह्य होते, त्यावेळी ते म्हणतात, हे असले जगणे हवे तरी कशाला? त्यापेक्षा स्वत:च मरण पत्करून ‘या शिक्षेतून सुटका करून घ्यावी!’ एकदा कविवर्य सुरेश भटांनीही नेमकी हीच भावना दोन बोटांत पकडली होती. ते म्हणतात -
“इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.”
एका कलंदर मानसिकतेने हा कवी जगला. तो म्हणतो जेव्हा जेव्हा मी घराचा, स्थिरतेचा, कायमच्या सहाऱ्याचा शोध घेतला तेव्हा माझ्या पदरी निराशाच आली -
‘घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली,
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते.’
जगाशी तुटलेला संवाद पुन्हा जोडण्याकरिता सुरेशजींनी खूप प्रयत्न केले पण त्यांचे सूर जगाशी कधी जुळलेच नाहीत. हे दुख ते एका ओळीत मांडतात -
‘ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.’
अशीच भावना तब्बल ९९ वर्षांपूर्वी जन्मलेले एक प्रख्यात उर्दू कवीही व्यक्त करतात. लखनऊच्या गौसनगर इथे ८ नोव्हेंबर १९२६ला जन्म झालेले कृष्ण बिहारी यांनी ‘नूर’ असे टोपणनाव घेऊन शायरी लिहिली. त्यांचे हिंदी इतकेच उर्दूवरही प्रभुत्व होते. लखनऊ विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतलेल्या बिहारीसाहेबांनी उत्तर प्रदेशाच्या परिवहन विभागात अधिकारी म्हणून नोकरी करत आपली साहित्याची आवड जोपासली. त्यांची ‘मेरे गीत तुम्हारे हैं’, ‘पथराई आंखोवाला यात्री’, ‘मेरी लंबी काविताए’, ‘दो औरते’, ‘पुरी हकीकत पुरा फसाना’, ‘नातूर’, ‘यह बहस जारी रहेगी’, ‘एक दिन ऐसा होगा’, अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
लखनऊमधील उर्दू मुशायऱ्यात ‘नूर’जींचे स्थान मोठे असायचे. त्यांच्याबद्दल एकाने लिहिले आहे, ‘नूरसाहेब जेव्हा कवी संमेलनाच्या स्टेजवर बसत तेव्हा वाटे की लखनऊच त्याच्या पूर्ण दिमाखात विराजमान झाले आहे. ते जेव्हा उठत तेव्हा वाटे जणू लखनऊची संस्कृतीच निघाली आहे.’
या शायरने एका गझलेत सामान्य माणसाचे दु:ख फार काव्यमयपणे मांडले आहे. ते म्हणतात -
‘ज़िंदगीसे बड़ी सज़ाही नहीं,
और क्या जुर्म है, पता ही नहीं!’
कृष्णबिहारी साहेबांना जाऊन २२ वर्षे झालीत पण खऱ्या कलाकाराला काळाचे बंधन नसते हेच खरे. कारण त्यांनी तेव्हाच आजच्या माणसाचे दु:खही किती यथार्थपणे मांडले आहे, पाहा! आज प्रत्येक जण करिअर, त्यातली गळेकापू स्पर्धा, संसारिक जबाबदाऱ्यांचे ओझे, व्यक्तिगत काळज्या, वेगवेगळे सामाजिक तणाव यांनी किती गांजला आहे! त्याचे जगणे इतक्या गोष्टीत विभागले गेले आहे, की त्याला त्याची स्वत:ची अशी उसंतच मिळत नाहीये. म्हणून कविवर्य म्हणतात-
‘इतने हिस्सोंमें बट गया हूँ मैं,
मेरे हिस्सेमें कुछ बचाही नहीं.’
प्रत्येक मुशायऱ्यात नूरसाहेबांच्या एकेका ओळीला श्रोते उत्स्फूर्त दाद देत असत. अगदी सोप्या भाषेत ते आपले निवेदन सादर करत. एकंदर मानवी जीवनाची अगतिकता मांडताना ते म्हणतात -
ज़िंदगी, ‘मौत तेरी मंज़िल है,दूसरा कोई रास्ताही नहीं!’
कुणी कितीही संपत्ती मिळवली, बंगले-माड्या बांधल्या, त्यांची कीर्ती जगभर पसरली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे. कुणालाही, काहीही कायमचे मिळत नसते. हा मुद्दा नूरसाहेब ‘दुसरा कोई रास्ताही नाही’ म्हणून अधोरेखित करतात.
जगात सत्य अभावानेच बोलले जाते. त्यात जर काही अधिक घातले तर किंवा सत्यातला एखादा घटक कमी केला तर सत्यच राहत नाही; परंतु खोट्याला तर सीमाच नसते. कारण त्याचा वापर करणारा कोणतीच नैतिक मर्यादा मानत नसतो. म्हणून कवी म्हणतात -
‘सच घटे, या बढ़े, तो सच न रहे.
झूटकी कोई इंतिहाही नहीं.’
जीवनाचा संघर्ष टाळण्यासाठी सुटकेचे कितीही प्रयत्न केले तरी जे प्रारब्ध आहे ते भोगावेच लागते ही माणसाची अगतिकता मांडताना नूरसाहेब जीवनालाच विचारतात -
‘ज़िंदगी अब बता कहाँ जाएँ?
ज़हर बाज़ारमें मिलाही नहीं.”
हल्ली जगभर धर्माच्या नावाने हिंसाचार, संघर्ष, युद्धे पेटली आहेत. त्याचे एक कारण ईश्वर आणि त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या धर्मगुरूंच्या कोत्या कल्पना हेही आहे. पण कवी म्हणतो ज्याच्या नावाने एवढे दंगेफसाद होतात तो देव तर मला कुठे दिसलाच नाही!
‘जिसके कारन फ़साद होते हैं,
उसका कोई अता-पताही नहीं.’
कवी अनेकदा काही सार्वकालिक सत्यही सांगून जातात. ‘शत्रूला माफ करा, मित्राइतकेच शत्रूवरही प्रेम करा’ असे सांगणाऱ्या येशू ख्रिस्ताला रोमन लोकांनी खटला भरून क्रुसावरचे मरण दिले. कायदा हा दुर्बल असतो, अनेकदा तर विकाऊ असतो, त्यात खऱ्या गुन्हेगाराला कधीच शिक्षा होत नाही. संन्यासीच अनेकदा फाशी जातो हेही नूरसाहेब परखडपणे सांगून जातात-
‘धनके हाथो बिके हैं सब कानून,
अब किसी जुर्मकी सजाही नही.’
मात्र माणसाची सदसदविवेकबुद्धी त्याला आतून इशारा देतच असते. पैशाच्या जोरावर न्यायव्यवस्थेला कधीकधी वाकवता येते तसे आपल्या आतल्या विवेकाच्या आवाजाला कोणत्याही प्रलोभनाने फसवता येत नाही हे कवीने किती चित्रमयशैलीत सांगितले आहे -
चाहे सोनेके फ़्रेममें जड़ दो,
आईना झूठ बोलताही नहीं.’
शेवटच्या शेरमध्ये ते जणू आपल्या मरणानंतर आपल्या चाहत्यांना होणाऱ्या दु:खाचा भार हलका करण्यासाठीच लिहून ठेवतात -
“अपनी रचनाओंमें वो ज़िंदा है
‘नूर’ संसारसे गयाही नहीं.”
आणि खरेच आहे की! असे साहित्यिक अमर असतात. त्यात यांचे नाव तर ‘नूर’ म्हणजे प्रकाशकिरण! जेव्हा सूर्य एका भूभागावर मावळत असतो तेव्हा तो दुसऱ्या एखाद्या देशाच्या आसमंतात सकाळचे ताजेताजे, कोमल किरण पसरवत उगवतच असतो! खुदाका नूर संसारसे जाताही नही.