Sunday, December 21, 2025

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात भडकलेल्या हिंसाचारादरम्यानच ही घटना घडली. यासंदर्भात अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माहिती दिली. तसेच, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नसून नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाचे नाव दीपू चंद्र दास असून तो २७ वर्षांचा होता.

दहा संशयितांना अटक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती देताना मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, दीपूची बेदम मारहाण करून अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर 'रॅपिड अॅक्शन बटालियन'ने मयमनसिंहच्या विविध भागात समन्वित छापे टाकून आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद लिमोन सरकार (१९), मोहम्मद तारिक हुसैन (१९), मोहम्मद माणिक मियां (२०), इरशाद अली (३९), निजुम उद्दीन (२०), आलमगीर हुसैन (३८) आणि मोहम्मद मिराज हुसैन एकॉन (४६) या सात जणांची नावे समोर आली आहेत. तर उर्वरित तीन जणांची नावे अद्याप समोर आली नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास अजूनही सुरू आहे.

शरीफ उस्मान हादी कोण होते? शरीफ उस्मान हादी (वय ३२) हे बांगलादेशमधील ‘इन्कलाब मंच’चे युवा नेते व प्रवक्ते होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जुलै २०२४ आंदोलन झाले होते. त्या आंदोलनानंतर ‘इन्कलाब मंच’ ही संघटना उदयास आली. या संघटनेला युवकांचा मोठा पाठिंबा मिळाला. शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात हादी हे अग्रस्थानी होते. त्यांनी हसीना यांच्यावर वेळोवेळी टीका केली होती. हसीना यांचे सरकार गेल्यानंतर हादी हे विद्यार्थी व स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील प्रमुख दुवा होते. विद्यार्थ्यांच्या मागण्या ते सरकारसमोर मांडत होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये ते निवडणूक लढवणार होते. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >