Friday, December 19, 2025

विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?

विक्रोळीत उबाठाचे खाते रिकामेच राहणार?

िचत्र पालिकेचे :

विक्रोळी िवधानसभा

सचिन धानजी मुंबई : विक्रोळी विधानसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून येत उबाठा शिवसेना नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी बांधला आहे. या प्रभागात महायुतीचे नगरसेवकांचे प्राबल्य असूनही विजयाचा तिलक महायुतीच्या उमेदवाराच्या कपाळी लावता आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रभागातून निवडून आलेले तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत गेल्यामुळे या विधानसभेत उबाठाचे खाते रिकामी झाले आहे. त्यामुळे नगरसेवक निवडून आणत पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न उबाठाचा असेल, परंतु महायुती सर्वच नगरसेवक निवडून आणत सुनील राऊतांची डोकेदुखी अधिक वाढवणार का यावर सर्वांचे लक्ष असेल. विक्रोळी विधानसभेमध्ये भाजपाचे दोन, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे एक अशाप्रकारे सहा नगरसेवक असून उबाठाकडील तिन्ही नगरसेवक हे शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे या विधानसभेत नगरसेवक संख्याबळानुसार शिवसेनेची ताकद मोठी असल्याने जागा वाटपांत चार जागा शिवसेनेला सुटल्या जातील आणि दोन जागांवर भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. तर महाविकास आघाडीमध्ये प्रभाग १११ आणि प्रभाग ११८वर मनसेचा दावा असेल. यातील प्रभाग ११८ हा शंभर टक्के मनसेला सोडला जाण्याची शक्यता आहे. तर उबाठा चार जागांवर आणि एक जागा मनसे व एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शप यांना सोडली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीतील विक्रोळी मतदार संघातील निकाल

संजय दिना पाटील, उबाठा : ६८,६७२ मिहिर कोटेचा, भाजपा : ५२,८०७ विक्रोळी विधानसभेतील निकाल सुनील राऊत, उबाठा : ६६,०९३ सुवर्णा करंज, शिवसेना : ५०,५६७

प्रभाग क्रमांक ११०(ओबीसी) हा प्रभाग पूर्वी महिलांकरता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपाच्या सारीका मंगेश पवार या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभाग ओबीसी राखीव झाला आहे. त्यामुळे भाजपाकडून पुन्हा सारीका पवार यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. तर उबाठाकडून दत्ताराम पालेकर, प्रणय पवार आणि सचिन चोरमले यांच्यात स्पर्धा आहे. यातील प्रणय पवार हे सारीका मंगेश पवार यांचे पुतणेच असून सचिन चोरमले हा त्यांचा स्वीय सहायक होता आणि त्यानंतर पवार कुटुंबाला सोडून आमदार सुनील राऊत यांच्याकडे गेला होता. तर काँग्रेसकडून परशुराम कोपरकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय पिसाळ आणि मनसेकडून पृथ्वीराज येरुणकर आणि सचिन घागरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र याठिकाणी भाजपा, उबाठा आणि काँग्रेस यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक ११७ ( ओबीसी महिला) हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि या प्रभागातून शिवसेनेच्या सुवर्णा करंजे या निवडून आल्या होत्या. आता पुन्हा हा प्रभाग ओबीसी महिलाकरता राखीव झाल्याने शिवसेनेकडून सुवर्णा करंजे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. या प्रभागातून उबाठामधून श्वेता पावसकर आणि मामी मंचेकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपाकडून रजनी कदम यांचे नाव चर्चेत असले तरी महायुती झाल्यास ही जागा शिवसेनेला सोडली जावू शकते. त्यामुळे याठिकाणी शिवसेना विरुध्द उबाठा अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

 प्रभाग क्रमांक ११८ (एस सी महिला) हा प्रभाग पूर्वी खुला असल्याने या मतदार संघातून शिवसेनेचे उपेंद्र सावंत निवडून आले होते. आता उपेंद्र सावंत हे शिवसेनेत असले तर प्रभाग एस सी महिला राखीव झाल्याने त्यांना दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे . त्यामुळे एस सी महिला प्रभागातून सिंड्रेला गवळी तर उबाठातून माधुरी दोडके यांच्या नावाची चर्चा आहे. तर मनसेकडून माजी नगरसेविका प्रियंका श्रुंगारे यांच्या नावाची चर्चा आहे. हा प्रभाग ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला सोडला जावू शकतो. त्यामुळे मनसे विरुध्द शिवसेना अशी लढत या प्रभागात होवू शकते.

प्रभाग क्रमांक ११९ (सर्वसाधारण) हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता आणि आता हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. याप्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा रहाटे या निवडून आल्या होता. परंतु हा प्रभाग खुला झाल्याने या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शप)कडून मनिषा रहाटे यांना पुन्हा संधी आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक या प्रभागातून इच्छुक आहेत तर उबाठाकडून चंद्रशेखर जाधव यांचेही नाव इच्छुकाच्या यादीत आहे. उबाठा , राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार असल्याने उबाठाच्या उमेदवाराला प्रभाग खुला होवूनही डोक्यावर हात मारत बसावे लागणार आहे.

 प्रभाग क्रमांक १२०( सर्वसाधारण) हा प्रभाग पूर्वी महिला आरक्षित होता आणि या प्रभागातून शिवसेनेच्या राजराजेश्वरी रेडेकर या निवडून आल्या होत्या. परंतु आता हा प्रभागा सर्वसाधारण प्रवर्गकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून राजराजेश्वरी रेडेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर उबाठाकडून निलेश पोहोकर आणि माजी नगरसेवक विश्वास शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, या प्रभागात काँग्रेस तसेच मनसेच्य इच्छुक उमेदवाराची चर्चा नाही. त्यामुळे या प्रभागात शिवसेना विरुध्द उबाठा अशीच थेट लढत होणार आहे.

 प्रभाग क्रमांक १२२( सर्वसाधारण) हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिला करता राखीव होता आणि या प्रभागातून भाजपच्या वैशाली पाटील या निवडून आल्या होत्या . परंतु आता या प्रभागाचे आरक्षण हे सर्वसाधारण झाले असून हा प्रभाग खुला झाल्याने भाजपाकडून विद्यमान नगरसेविका वैशाली पाटील यांच्यासह श्रीनिवास त्रिपाटी यांच्या नावाची चर्चा आहे. तर उबाठाकडून विजय कुरकुटे, सचिन मदने आणि निलेश साळुंखे यांच्या नावाची चर्चा आहे. तर या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून माजी नगरसेवक चंदन शर्मा यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु चंदन शर्मा यांनीही आता भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपामधील इच्छुकांच्या यादीतील एक नाव वाढले आहे. चंदन शर्मा यांच्या प्रवेशामुळे वैशाली पाटील आणि श्रीनिवास त्रिपाटी यांच्या उमेदवारीवर काट मारली जाण्याची शक्यता आहे. चंदन शर्मा यांच्या माध्यमातून या प्रभागावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता. पण चंदन शर्मा यांच्या भाजपा प्रवेशामुळे आता या प्रभागातील उबाठाची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदन शर्मा यांना भाजपात प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment