मंदिराखाली होणार १२९ गाड्यांसाठी वाहनतळ
मुंबई : प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत असून सुशोभीकरणाच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु आचारसंहितेमुळे या कामाला येत्या निवडणूक प्रक्रियेनंतरच सुरुवात केली जाणार आहे. या सुशोभीकरणासाठी तब्बल ९८ कोटी रुपये खर्च केलेे जाणार आहेत. यामध्ये मंदिराचे प्रवेशद्वार, बाहेरील दगडी भिंत तसेच तळ अधिक दोन मजल्यांचे १२९ वाहन क्षमतेच्या वाहनतळाचे बांधकाम केले जाणार आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ आहे. श्री सिद्धिविनायक मंदिरात जगभरातील लाखोंच्या संख्येत भाविक दर्शनाकरिता येतात. त्याअानुषंगाणे भाविकांची होणरी गैरसोय टाळण्याकरिता व श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सुरक्षेततेच्या दृष्टीने श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराची सुधारणा करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांनी श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे सुशोभीकरण मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात यावे असे निर्देश दिले होते. त्याअानुषंगाने महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार 'जी/उत्तर' विभागाच्यावतीने श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि सुधारणा करण्याचे काम हाती घेण्याचाची प्रक्रिया सुरू केली. या सुशोभीकरणाच्या कामांसाठी मागवलेल्या निविदेत के एच कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली असून या कामांसाठी ९८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
श्री. सिद्धिविनायक मंदिराचे गेट, मंदिराच्या आतील व बाहेरील भिंतीवर दगडी आवरणाचे काम करणे, मंदिराच्या उत्तरेकडील छत, मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या फरशी, लाईट व प्लंबिंग इ. कामे करणे. तळघरात सुमारे १२९ वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळ.विद्युत कामे व इतर दुरुस्तीची कामे करणे.






