भाजपच्या 'त्या' प्रस्तावानंतर मुंबईसाठी मास्टरप्लान तयार
मुंबई : भाजप आणि शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची घोषणा करत जागावाटपाची चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेने भाजपकडे १२५ जागांची मागणी केली. पण भाजपने त्यांना जागावाटपाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ५० ते ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने निवडणुक लढविण्यासाठी प्लान बी तयार करुन तशी तयारीही सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने सन्मानजनक जागा न दिल्यास शिवसेनेनं पर्यायी योजना आखली असून स्वबळावर निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
१५ जानेवारीला मुंबई महापालिकेसाठी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. २०२२ ला महापालिका सभागृहाची मुदत संपुष्ठात आल्यानंतर तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. शिवसेनेने गेल्या काही महिन्यांमध्ये उबाठा गटातील माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावरआपल्याकडे खेचले आहेत. याच संख्याबळाच्या आधारे शिवसेनेने भाजपकडे १२५ जागांची मागणी केली. पण भाजपने त्यांना केवळ ५० ते ६० जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने पर्यायी योजना म्हणून २२७ जागांवर तयारी केल्याची माहिती आहे. युती करुन संख्याबळ घटण्याचा धोका लक्षात घेता, स्वबळावर ताकद आजमावून शंभरच्या आसपास नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरु झाली आहे.
मुलाखतीसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती : 'महायुतीमधील पक्ष म्हणून शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक लढवेल. सर्वोत्तम उमेदवार देण्यावर आमचा भर आहे. त्यामुळेच आम्ही सगळ्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक राहावी यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे,' अशी माहिती शेवाळे यांनी दिली. अन्य पक्षांपेक्षा शिवसेनेच्या मुलाखतींना मिळणारा प्रतिसाद जास्त मोठा आहे. यातून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना केलेले काम अधोरेखित होतं, असे शेवाळे म्हणाले. शिवसेनेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मुलाखतींना देणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेशी संबंध राहिलेल्यांचा समावेश आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी ही मंडळी उत्सुक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरी जात आहे.
२७०० इच्छुकांच्या मुलाखती
मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग येतात. या सगळ्या प्रभागांमध्ये स्वबळावर लढण्याची चाचपणी शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास शिवसेनेकडून निवडणूक लढविण्यासाठी २७०० इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. प्रत्येक प्रभागात मजबूत आणि जिंकण्याची खात्री असलेला उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.