विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्वाळा
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा सातारा अमली पदार्थ प्रकरणात कोणताही सहभाग नाही. पोलिसांनी आजवर केलेल्या तपासात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. विरोधकांनी केवळ राजकीय स्वार्थापोटी सातारा अमली पदार्थ प्रकरणात शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शिंदे यांच्यावरील आरोप फेटाळून लावत त्यांची पाठराखण केली.
महापालिका निवडणुकांमधील जागावाटपाची चर्चा व एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्याच्या घटनेमुळे ताणलेल्या राजकीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिंदे यांची पाठराखण केली. कसल्याही प्रकारचा संबंध नसताना विरोधकांनी आरोप करणे चुकीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.
बिबट्या पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढविणार :
राज्यात बिबट्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अधिवासातून बाहेर येऊन मानवी वस्तीतील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे बिबट्यांच्या पुनर्वसन केंद्रांची युद्ध पातळीवर निर्मिती केली जात आहे. मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांना पकडून त्यांना केंद्रात ठेवले जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.






