Saturday, December 20, 2025

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील (९४) यांचे मुंबईतील घरी निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मागील काही दिवसांपासून शालिनीताई आजारी होत्या. या आजारपणातच त्यांचा मृत्यू झाला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. साताऱ्याचे उदयनराजे भोसले शालिनीताईंना मातेचा दर्जा देत तर बाळासाहेब ठाकरे शालिनीताईंना महाराष्ट्राची वाघीण म्हणायचे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पाडळी गावात शालिनीताईंचा जन्म झाला होता. त्यांचे वडील पोलीस पाटील होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा वारसा त्यांच्या घरात चालत आलेला. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये बीए केलेल्या शालिनीताईंनी पुढे लग्न केलं. लग्नानंतर १९५७ मध्ये त्या पहिल्यांदा सांगली जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत बोरगाव मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या. काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या शालिनीताईंची या निवडणुकीच्या निमित्ताने वसंतदादांशी ओळख झाली. कारण काँग्रेसने पक्षाच्यावतीने सांगली जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीची जबाबदारी वसंतदादांकडे होती.

सर्व सुरळीत सुरू असताना १९६४ मध्ये शालिनीताईंच्या पतीचे निधन झाले. शालिनीताई एकट्या पडल्या. त्यांची मुले लहान होती. शालिनीताईंनी वकिलीच शिक्षण घेतलं होतं पण त्यावर लगेच प्रॅक्टिस सुरू करुन पैसा उभा करण त्यांना शक्य वाटत नव्हतं. चार मुलांना सांभाळणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. अशात वसंतदादा पुढे आले. वसंतदादांच्या पहिल्या पत्नीचे निधन आधीच झाले होते. त्यामुळे वसंतदादांनी एक निर्णय घेतला आणि शालिनीताईंच्या चारही मुलांना दत्तक घेतलं. शालिनीताई पाटील यांच्याशी लग्न केलं. यामुळे शालिनीताईंना नवी ओळख मिळाली.

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर पकड असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची दुसरी पत्नी म्हणजे शालिनीताई. पण लग्नाआधीच शालिनीताई राजकारणात आल्या होत्या. वसंतदादांच्या सावलीशिवाय शालिनीताई यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व होतं. उच्चशिक्षित, हुशार, राजकारणातील खाचाखोचा समजणाऱ्या शालिनीताई वसंतदादांना प्रशासकीय कामांमध्ये मदत करत होत्या. वसंतदादांसाठी शालिनीताईंनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करायला सुरुवात केली. इथूनच त्यांचं राजकीय महत्व वाढलं.

वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात १९८० मध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. तेव्हा सातारा लोकसभेत यशवंतरावांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस शालिनीताई पाटलांनी दाखवलं होतं. तब्बल दीड लाख मते मिळवली होती. शालिनीताई या निवडणुकीत हरल्या पण एरवी दोन लाखांच्यावर मताधिक्य घेणाऱ्या यशवंतरावांना पहिल्यांदाच जेमतेम ५० हजारांच्या मताधिक्याने समाधान मानावे लागले. यामुळे इंदिरा गांधींपर्यंत शालिनीताईंचे नाव पोहोचले. जेव्हा इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोद सरकार खाली खेचलं आणि राष्ट्रपती राजवट लावली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शालिनीताई पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. पण वसंतदादांनी विरोध केल्यामुळे त्या मुख्यमंत्री झाल्या नाही. स्वतः शालिनीताईंनीच ही माहिती माध्यमांना दिली होती.

वसंतदादांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. मात्र अंतुले सरकारमध्ये शालिनीताईंचा मंत्री म्हणून समावेश झाला होता. शालिनीताईंनीच अंतुलेंचा सिमेंट घोटाळा उघड केला होता. यामुळे मुख्यमंत्री अंतुलेंना काही वर्षांतच राजीनामा द्यावा लागला होता. शालिनीताईंनी काही काळ सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच १९९९ ते २००९ या काळात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

शालिनीताई पाटील - जन्म १९३१ आणि निधन २० डिसेंबर २०२५

पहिले पती - श्यामराव जाधव

Comments
Add Comment