मोहित सोमण
प्रयत्नांची पराकाष्ठा व्यक्तीला मोठ्या उंचीवर नेते. व्यवसायाचेही तसेच आहे. केवळ मेहनत नाही तर योग्य दिशा आपल्या व्यवसायाबाबत सक्षम करते. केवळ चूक, बरोबर, योग्य, अयोग्य असे न बघता आलेल्या अचूक संधीचा अचूक फायदा घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळेच व्यवसाय करताना अथवा आपला बिझनेस वाढवताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेणे संयुक्तिक ठरते.
व्यवसाय वाढवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स -
१) नक्की काय करायचंय? - नक्की काय करायचंय हे जाणून घेण्यासाठी आधी आपली पार्श्वभूमी व आपली आवड जाणून घेणे महत्वाचे ठरते. लोकांना काय आवडते त्यापेक्षा आपल्याला काय आवडते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. नक्की आपल्याला कुठला व्यवसाय करायचा आहे आपलं उत्पादन काय असेल आपल्या व्यवसायाचे उद्दिष्ट काय आहे त्या व्यवसायातील संधी व धोके कुठले त्याचा आपल्याकडे काय अँक्शन प्लान अथवा बॅकअप प्लॅन काय या सगळ्याच गोष्टीचे नियोजन आपल्या व्यवसायात करणे महत्वाचे आहे. त्या उत्पादनाला कुठले कायदे, कुठले नियमन लागू होतात तसेच त्या उत्पादन अथवा सेवेचा त्याचा नव्या बदलत्या काळातील संदर्भ काय? त्यातून नेमके साध्य काय करायचे आहे ते जाणून घ्या. तज्ञांसोबत बसून चर्चा करा व नेमके ध्येय निश्चित करा.
२) एक पेपर हातात घ्या - एकदा उद्दिष्ट निश्चित केले की, हातात एक पेपर घ्या. आपले नियोजन आपले उत्पादन लिहून काढा. बाजारात ते कसे सादर करायचे त्यासाठी भांडवल कुठून उभे करायचे? पुढे ते संपूर्ण मुदतीत फेडण्यासाठी व्यवसायाची रणनीती काय असली पाहिजे? आपण आधी जे नियोजन केले आहे ते बॅकअप प्लॅनशी सुसंगत आहे का? याचा परामर्श घेतला पाहिजे. त्यानंतर व्यवसायाचा रोडमॅप अथवा प्रोजेक्ट प्लॅन बनवून तो प्रोजेक्ट पेपर पुन्हा एकदा तज्ञांना दाखवावा. एकदा तो फेरबदल नसल्यास व तो निश्चित केल्यास त्यानुसार बँकेतून कर्ज उभारणी अथवा इतर स्त्रोतातून भांडवल मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.
३) भांडवल निर्मिती- भांडवल निर्मिती हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाचे शिक्षण, आवड, पार्श्वभूमी वेगळी असू शकते. आपली आवड, आपले शिक्षण व आपली पात्रता याची संपूर्ण चिकित्सा करूनच योग्य तो निर्णय भांडवल उभारणीत घेतला पाहिजे. त्यानुसार व्यवसायाची दिशा सुनिश्चित करावी.
४) ब्रँड पोझिशनिंग- आज तंत्रज्ञानाच्या युगात सर्वात महत्वाची बाब म्हणजे ब्रँड पोझिशनिंग आहे. आपला व्यवसाय करण्याआधी आपला ग्राहकवर्ग कोण आहे त्याला नक्की काय हवे आहे? त्याची कुठली गरज अद्याप बाजारात पूर्ण होऊ शकली नाही. कुठला पर्याय व सोलूशन त्याला बाजारात भावेल व तो आपला नियमित ग्राहक बनेल यासाठी आपला उत्पादन, डिझायनिंग, पॅकेजिंग, टेक्नॉलॉजी प्रणित काही नवीन सोलूशन निश्चित करुन त्याची तयारी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला ब्रँडिग लोगो निर्मिती करावी लागेल. अर्थात उत्पादनाची निश्चिती झाल्यावर तो लोगो ट्रेडमार्क रजिस्टर करावा, ही सर्वात मोठी पायरी आहे. ब्रँड पोझिशनिंग म्हणजे तुमचा ब्रँड लोकांच्या मनात डोळ्यात पक्का झाला पाहिजे. त्यासाठी त्यांच्या दृष्टीत उत्पादनाच्या अनुभवा व्यतिरिक्त तो ब्रँड नजरेत कायमचा कैद व्हावा यासाठी व्युहरचना आखणे याला ब्रँड पोझिशनिंग म्हणतात.
५) नेटवर्क उभारणे- जनसंपर्क उभा करणे हे व्यवसायाचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय व्यवसाय शक्य नाही. तो केवळ नागरिकांचा नाही तर व्यवसायात आवश्यक असलेल्या प्रत्येक लोकांच्या साखळीतील असू शकतो. वितरक, जाहिरातदार, ब्रँड कस्टोडिअन, उत्पादन कंपन्या, माल पुरवणाऱ्या कंपन्या (Original Equipment Manufacturer OEM) या सगळ्यांशीच उत्तम संबंध असेल तर व्यवसायाला दीर्घायुष्य मिळते. त्यामुळे व्यवसाय सुरु करताना पहिल्या दिवसापासून वाणीवर ताबा हवा.
६) सुरूवातीला अनावश्यक कर्ज टाळा- सुरूवातीला अनावश्यक कर्ज ठाळले पाहिजे. जाहिरातीचा खर्च पहिल्या भांडवल निर्मितीतील फेरीत टाळला पाहिजे. विशेषतः ओओएच जाहीराती, टीव्हीवरील जाहिराती, इतर महागड्या जाहिराती टाळल्या पाहिजेत. त्यापैक्षा सोशल मिडिया नेटवर्क, अथवा इतर पर्यायी माध्यमांचा कमी खर्चात वापर करावा. कारण बाजारात प्रत्येक उत्पादनासाठी जीवघेणी स्पर्धा आहे. जर तुमचे उत्पादन सर्वसामान्य असेल तर केवळ उत्पादनांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करावे ज्यामुळे तुमचा उत्पादनाचा अथवा सेवेचा खर्च मर्यादित राहील व हातात खेळते भांडवल अधिक राहिल. जर तुमचे उत्पादन नवी संकल्पना असेल तर त्याचीही जाहिरात करताना 'माऊथ पब्लिसिटी' चा सर्वाधिक वापर करावा. हळूहळू ते उत्पादन लोकप्रिय झाले की हातात रोख गुंतवणूक अधिक वाढेल त्यातून जाहिरात सुरूवात करायला हरकत नाही परंतु ती करत असताना आक्रमक जाहिरातबाजी टाळावी. उत्पादन चांगले असेल तर लोक कायमचे तुमचे ग्राहक असतील. पण उत्पादनच खराब असेल तर जाहीरात करून उपयोग होणार नाही.
७) दुसऱ्या उत्पादनांची निंदा नालस्ती टाळा- तुमचा स्वभाव कसाही असेल धंद्यात सगळ्यांशी चांगले संबंध ठेवण्यावर विश्वास ठेवा. कोण व्यक्ती कधी कुठे मदतीला उपयोगी पडेल माहिती नाही. त्यामुळे वितरक, ग्राहक, अथवा घाऊक व्यापारी, इतर किरकोळ व्यापारी यांच्याशी बोलताना इतर उत्पादनांची निंदा नालस्ती टाळा. त्यातून हितशत्रू निर्माण होतात. त्यामुळे भविष्यात नुकसान होऊ शकते.
८) हूरळून जाऊ नका- उत्पादन चालले तरी हूरळून जाऊ नका. उत्पादनाच्या दर्जावर लक्ष घालताना आपल्या बॅलन्सशीट कडेही लक्ष द्या. इतर गोष्टीचे सोंग घेता येते पैशाचे घेता येत नाही. त्यामुळे पहिली व्यवसायाची ५ वर्ष घोरपडीसारखे टिकून बाजारात उभे राहण्याचे धैर्य ठेवा. बॅलन्सशीट दणक्यात असली तर तुम्हाला ब्रम्हदेवही आडवू शकत नाही.
९) पुढील पायरी- व्यवसायात फंडामेंटली चमक दिसल्यास त्यानंतर राऊंड २ सीड फंड किंवा वेंचर कॅपिटलकडून तुम्ही निधी उभारू शकता. त्यासाठी तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी व विस्तारित करण्यासाठी अनेक भांडवली कंपन्या आहेत ज्या तुम्हाला मदत करतात. मात्र कंपनी, भांडवली गरज किती किती रक्कम, कंपनीच्या काय अटीशर्ती यांचा सांगोपांग अभ्यास करूनच निर्णय घ्या. दोन दिवस उशीर परवडेल पण नुकसान परवडत नाही.
१०) थेट आयपीओतील जाण्याचे टाळा- अनकेदा भांडवली बाजाराची गणिते वेगळी असतात. त्यामुळे प्रत्यक्ष सूचीबद्ध (Listed) होण्याआधी आपली पकड आधी मजबूत केली पाहिजे. अनेकदा छोट्या कंपन्या बाजारात सूचीबद्ध होतात. पण शेअर बाजारात चांगले प्रदर्शन न दाखवत गुंतवणूकदारांना निराश करतात त्यातून कुठलेही आकस्मिक संकट येऊ शकते. त्यामुळे आयपीओत उतरवण्याआधी संपूर्ण तयारी करत योग्य वेळी उतरा.
११) महत्वाकांक्षी व्हा पण राक्षसी महत्वाकांक्षा नको! - महत्वाकांक्षा असणे वाईट नाही पण व्यवसायासाठी वाटेल ते असे विचार मनात येतात तेव्हा वैचारिक बैठक संपुष्टात येते. त्यामुळे चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण केल्यास त्यातून कंपनी मोठी होईलही पण खाली यायला वेळ लागणार नाही. आणी खाली नाही आली तरी कोणी चांगले म्हणणार नाही हा सृष्टीचा नियम आहे.
१२) बाजारात विश्वसनीयता- बाजारात सगळ्यात मोठी काय आहे ते म्हणजे विश्वसनियता. गुडविल हे व्यवसायिकाचे पैशापेक्षा अधिक मोठे भांडवल आहे. एक ब्रँड बघितला की लोकांचा एक विश्वास असतो तो तडीला न जाऊन देण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय येतील व्यवसाय जातील पण नाव गेल्यावर कुटुंबीयांचे पण अधःपतन होत जाते.
१३) सातत्य - मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीशिवाय आयुष्य नाही. आयुष्य नसेल तर ईश्वरप्राप्ती नाही. त्यामुळे व्यवसाय हा आपला देव आहे मानून प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्याने करायला हवी. व्यवसायात सुट्टी नसते ही खूणगाठ बांधूनच पुढील मार्गक्रमण करावे. त्यासाठी आवश्यक व्ह्यूरचना बनवावी.
१४) राजकारण्यांपासून समान अंतर राखावे- सत्ता येते सत्ता जाते पण कोणाशी जवळीक असलेला टॅग मात्र पुसता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा भविष्यात त्रासही होऊ शकतो फायदाही होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या पुढाऱ्यांशी समान अंतर राखावे. पण याचा अर्थ असा नाही की शत्रुत्व घ्यावे. सत्तेसमोर शहाणपणा नसतो. सगळ्यांशी व्यवसायिक संबंधावर मर्यादित रहावे.
१५) ग्राहक आपला देव- अंतिम सत्य म्हणजे ग्राहक हा परमेश्वर त्यामुळे ग्राहक केंद्रित उत्पादन बाजारात आणल्यास त्याचा यथेच्छ लाभ व्यवसायात येतो. तसेघ आपल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यावर विश्वास ठेवावा. त्यामुळे ही तिकडी व्यवसायाला यशस्वी बनवते.
१६) योग्य संधी- प्रत्येक धंद्यात चढउतार येतात त्यामुळे घाबरून जायचे कारण नाही हीच ती सत्वपरीक्षा असते. डोकं थंड ठेवून विचार केल्यास मार्ग मिळत जातो. व्यवसाय चालला तर उत्तम नाही चालल्यास अशा वेळी बचत कामी येते. त्या बचतीचा वापर करून प्रासंगिक संकटाला तोंड द्यावे व पुढील प्लान निश्चित करावा. अशा वेळी मनात एक बॅकअप प्लॅन कामाला येतो. ज्याला आपण व्यवस्थापनाच्या दृष्टीने 'कंटीजंसी मॅनेजमेंट' म्हणतो. जशी परिस्थिती असेल तसे वागत प्रासंगिक चातुर्य दाखवणे याला कंटीजंसी म्हणतात.
त्यामुळे अशी मेहनत केल्यास व्यवसाय फुलतो. व्यवस्थेशिवाय व्यवसाय नाही. त्यामुळे या गोष्टी पाळल्यास तुमचा व्यवसाय कोणीही रोखू शकत नाही. सचोटी ही अंतिम सत्य आहे. व्यवसाय आहे तर ते केलेच पाहिजे. पण करायचे म्हणून नाही तर मन आहे म्हणून करायचे.






