Saturday, December 20, 2025

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला. सैरांगवरून नवी दिल्लीच्या दिशेने वेगात जाणारी राजधानी एक्सप्रेस हत्तींच्या एका मोठ्या कळपाला धडकली. रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत होता. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रेनचे इंजिन आणि त्यामागील पाच डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ८ हत्तींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून काही हत्ती गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळावर हत्तींचा कळप असल्याचे लक्षात येताच लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, राजधानी एक्सप्रेसचा वेग प्रचंड असल्याने ब्रेक लागण्यापूर्वीच इंजिन हत्तींना जाऊन धडकले. सुदैवाने, या अपघातात प्रवाशांच्या जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर ईशान्येकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथके रवाना केली असून घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. वन विभाग आणि रेल्वे पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राजधानीच्या धडकेने हत्तींच्या शरीराचे झाले तुकडे

हत्तींच्या कळपात झालेली टक्कर किती भीषण होती, याची अंगावर काटा आणणारी दृश्ये आता समोर येत आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की, हत्तींच्या शरीराचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. हत्तींचे छिन्नविच्छिन्न झालेले अवशेष रेल्वे ट्रॅकवर लांबवर विखुरले गेले होते. या विदारक परिस्थितीमुळे हा रेल्वे मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला असून, अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत, तर काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे प्रशासनावर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा ट्रेनमधील प्रवासी गाढ झोपेत होते. अचानक बसलेल्या प्रचंड झटक्यामुळे (Jerk) संपूर्ण ट्रेन हादरली आणि प्रवासी आपल्या आसनावरून खाली कोसळले. डबे रुळावरून घसरत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि घबराट पसरली. बाहेर हत्तींचा आक्रोश आणि आत प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. सुदैवाची आणि दिलासादायक बाब ही की, या भीषण अपघातात ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरूनही कुठल्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही. किरकोळ खरचटल्याच्या घटना सोडल्यास सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र, डोळ्यादेखत हत्तींचे झालेले हाल आणि अपघाताचा तो अनुभव पाहून प्रवासी अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाहीत. रेल्वे कर्मचारी सध्या ट्रॅकवरील प्राण्यांचे अवशेष हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.

राजधानी गुवाहाटीकडे रवाना

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी तातडीने पावले उचलली आहेत. या अपघातात राजधानी एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना त्याच ट्रेनमधील इतर डब्यांमधील रिकाम्या बर्थवर त्वरित शिफ्ट करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता पाहून रुळावरून घसरलेले आणि प्रभावित झालेले डबे मुख्य ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत. आवश्यक तांत्रिक तपासणी पूर्ण केल्यानंतर, उर्वरित डब्यांसह राजधानी एक्सप्रेसला गुवाहाटीच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही ट्रेन जेव्हा गुवाहाटी स्थानकावर पोहोचेल, तेव्हा प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि आसनक्षमतेसाठी अतिरिक्त डबे ट्रेनला जोडले जातील. त्यानंतरच ही ट्रेन दिल्लीच्या दिशेने आपला पुढील प्रवास पुन्हा सुरू करेल. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आरामाची व्यवस्था करण्यात आल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे प्रवाशांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >