नवाबगंज : काही वर्षांपूर्वी साध्या सायकलवरून फिरणारा एक यूट्युबर अचानक आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक कसा झाला, याचं उत्तर शोधण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय मैदानात उतरलं . दुबईत समुद्रावर क्रूझवर थाटात लग्न उरकून मायदेशी परतलेल्या यूट्युबर अनुराग द्विवेदीच्या घरावर ईडीने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील नवाबगंज परिसरात राहणारा २५ वर्षीय अनुराग द्विवेदी सोशल मीडियावर, विशेषतः यूट्युबवर प्रचंड लोकप्रिय आहे. यूट्युबच्या माध्यमातून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली असली, तरी अचानक झालेली अफाट संपत्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याच्या आयुष्यातील झपाट्याने बदललेला हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही थक्क करणारा आहे.
अनुराग नुकताच दुबईत झालेल्या त्याच्या शाही विवाहसोहळ्यामुळे चर्चेत आला . समुद्रात क्रूझवर पार पडलेल्या या लग्नासाठी त्याने उन्नावमधील नवाबगंज येथून नातेवाईकांना स्वखर्चाने दुबईला नेले होते. या विवाहाला बॉलिवूडमधील काही कलाकार उपस्थित होते, अशीही चर्चा रंगली. मात्र नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसच झालं आणि हा झगमगाट फार काळ टिकू शकला नाही.
दुबईतील विवाहसोहळा आटोपून भारतात परतताच ईडीने अनुरागच्या घरावर धाड टाकली. ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून ईडीने त्याच्या घरातून चार महागडी वाहने जप्त केली आहेत. ज्यात लॅम्बोर्गिनी आणि मर्सिडीजसारख्या लक्झरी कारचा समावेश आहे. ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, या गाड्या सट्टेबाजीच्या अवैध पैशातून खरेदी करण्यात आल्याचा संशय आहे. कारण सायकलने प्रवास करणारा अनुराग अचानक मोठ्या आलिशान कार फिरवू लागला.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अनुरागवर स्काय एक्सचेंजसह इतर ऑनलाइन सट्टेबाजी ॲप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध कमाई केल्याचा आरोप आहे. हे ॲप्स भारतात बेकायदेशीर असल्याचे सांगितले जाते. अनुरागने आपल्या यूट्युब चॅनल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून या ॲप्सचे प्रमोशन केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याबदल्यात त्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ईडीचा दावा आहे की या पैशांची मनी लॉन्ड्रिंग करून त्यातून महागड्या गाड्या आणि मालमत्ता खरेदी करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून तपास अजूनही सुरू आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सामील आहेत, किती पैसा परदेशात पाठवण्यात आला आणि या व्यवहारांमध्ये कोणते मोठे चेहरे सहभागी आहेत, याचा शोध ईडी घेत आहे. येत्या काळात अनुरागच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






