टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
ऋता दुर्गुळेने अभिनयाच्या क्षेत्रात आपला चांगलाच ठसा उमटविला आहे. 'उत्तर ' हा तिचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. 'ठरलंय फॉरेव्हर' हे नाटक देखील ती करतेय. नाटकाची सहनिर्माती देखील ती आहे. चित्रपट व नाटक यामध्ये काम करताना तिला अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
घरात अभिनयाच्या क्षेत्रात कोणीही नव्हतं, तरीदेखील ती आजची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. दादरच्या किंग जॉर्ज शाळेत तिचे शालेय शिक्षण झालंय. शिशुवर्गात असताना तिने समूह नृत्यात भाग घेतला होता. नंतर तिने रुईया कॉलेजमधून मास मीडिया केलं. त्याच वेळी तिला पहिली मालिका मिळाली होती. तिचे नाव होते 'दुर्वा'.
'दुर्वा' मालिकेपासून तिच्या अभिनयाला सुरुवात झाली. या मालिकेत तिला खूप मोठ्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यामध्ये विनय आपटे, मुग्धा शहा, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सृजा प्रभुदेसाई हे सर्व कलाकार होते. या मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे व गिरीश वसईकर यांच्याकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. जवळपास चार वर्षे ही मालिका सुरू होती. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळाला. 'दादा एक गुड न्युज' हे तिचं पहिलं नाटक होय.
'अनन्या' हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. तो चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. त्या चित्रपटासाठी तिला भरपूर शारीरिक मेहनत घ्यावी लागली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर तिच्यावर खूप दडपण होतं, परंतु चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रेमाने ती भारावून गेली.
'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचे तिने सूत्रसंचालन केले होते. लॉक डाऊन संपत असताना या कार्यक्रमाचे शूटिंग सुरू झाले होते. सगळेजण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचे शूटिंग करीत होते. एक वेगळा अनुभव तिला मिळाला.
क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' हा तिचा चित्रपट हल्लीच प्रदर्शित झालेला आहे. आईला साऱ्याच प्रश्नाची उत्तरं माहीत असतात, अशी या चित्रपटाची टॅगलाइन होती. घराघरात आईला गृहीत धरलं जातं, मात्र तिच्या प्रश्नाची उत्तरं तिलाच शोधावी लागतात. आई आणि मुलाच्या नातेसंबंधाची गोष्ट धरत तंत्रज्ञानावर पूर्ण आरूढ होऊन त्यातच हरवू पाहणाऱ्याना नव्याने स्वतःशी संवाद साधायला लावणारा हा चित्रपट आहे. एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं दर्शन या चित्रपटामध्ये घडत आहे. रेणुका शहाणे यांनी आईची भूमिका साकारली आहे. क्षिप्राची व्यक्तिरेखा ऋताने साकारली आहे. खूप इंटरेस्टिंग पात्र आहे. त्यासाठी तिला तिच्या लूकवर काम करावे लागले. जेनजी पात्र आहे ते.
आई ही कधीच थकत नाही. तिच्या जिद्दीला सलाम करावासा तिला वाटतो. तिचं तिच्या आईसोबत भाडंण होतं आणि लवकर मिटतं देखील. कारण दोघांच्या नात्यांमध्ये गोडवा असतो. खरोखर आईला सर्व प्रश्नांची उत्तर माहीत असतात, असे ती मानते. टर्निंग पॉइंट अजून तिच्या आयुष्यात यायचा आहे, असे तिला वाटते. भावी आयुष्यासाठी तिला हार्दिक शुभेच्छा!






