Saturday, December 20, 2025

भारताचा मालिका विजय

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ

अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी-२० सामना भारताने ३० धावांनी जिंकला. या विजयासह भारताने ५ सामन्यांची ही मालिका ३-१ अशा फरकाने आपल्या नावावर केली. मालिकेतील चौथा सामना पावसामुळे रद्द झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी 'मिस्ट्री' ठरलेल्या वरुण चक्रवर्तीने आपला कहर सुरू ठेवत ४ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉकने ६५ धावांची झुंजार खेळी केली, परंतु भारताच्या २३२ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना यश आले नाही.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताकडून डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने केली. या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना जवळपास १० ची धावगती ठेवली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली.

पण अखेर अभिषेकला ६ व्या षटकात कॉर्बिन बॉशने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातून झेलबाद केले आणि ही जोडी तुटली. अभिषेकने २१ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकारासह ३४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने डाव पुढे नेला. तिलकही आक्रमक खेळत होता.

संजूनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेतला. पण अखेर त्याची खेळी १० व्या षटकात जॉर्ज लिंडने संपवली. संजू ४ चौकार आणि २ षटकारांसह २२ चेंडूंत ३७ धावांवर असताना त्रिफळाचीत झाला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही ५ धावांवरच बाद झाला. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नंतर हार्दिक पांड्याचे वादळ घोंगवले. त्याला तिलक वर्माचीही साथ मिळाली. हार्दिकने फलंदाजीला आल्यापासून चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्याने १५ व्या षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांसह २७ धावा चोपल्या. त्यानंतर केवळ १६ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याआधी तिलकनेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.

अखेर शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याला ओटनील बार्टमनने बाद केले. हार्दिकने २५ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावा केल्या. तिलक वर्माही शेवटच्या षटकात धावबाद झाला. त्याने ४२ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ७३ धावा केल्या. हार्दिक आणि तिलक यांच्यात १०५ धावांची भागीदारी झाली. शेवटी शिवम दुबेने एक चौकार आणि १ षटकारासह ३ चेंडूंत १० धावा करत भारताला २० षटकात ५ बाद २३१ धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉशने २ विकेट्स घेतल्या. तसेच ओटनील बार्टमन आणि जॉर्ज लिंडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हार्दिकने मोडला अभिषेकचा विक्रम

हार्दिकने या सामन्यात केवळ १६ चेंडूंत अर्धशतक केल्याने त्याने मोठा विक्रम केला. तो आता आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने अभिषेक शर्माला मागे टाकले आहे. अभिषेकने वानखेडे स्टेडियमवर याचवर्षी इंग्लंडविरुद्ध १७ चेंडूंत अर्धशतक केले होते. या यादीत अव्वल क्रमांकावर युवाराज सिंग असून १८ वर्षांपासून हा विक्रम त्याच्या नावावर आहे. २००७ टी-२० वर्ल्ड कपमध्ये युवराजने इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूंत अर्धशतक केले होते.

संजू सॅमसनच्या १००० धावा पूर्ण

टी-२० कारकिर्दीत १००० धावा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या चेंडूंच्या संख्येनुसार, संजू सॅमसनने आता हार्दिक पांड्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. संजूने ही कामगिरी करण्यासाठी फक्त ६७९ चेंडू घेतले. यादरम्यान त्याने केएल राहुल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंना पिछाडीवर टाकले आहे. या सामन्यापूर्वी संजूला १००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. डावाची सुरुवात त्याने अत्यंत संयमाने केली आणि तिसऱ्या चेंडूवर खाते उघडले. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॅन्सनला मारलेला खणखणीत षटकार ऐतिहासिक ठरला. याच षटकारासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या.

संजूचा जोरदार फटका अंपायरला लागला

भारताच्या डावातील ८ व्या षटकात डोनोव्हन फरेरा गोलंदाजीला आला. तिलक वर्माने या षटकात पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारल्यावर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राइक संजूला दिले. चौत्या चेंडूवर संजूने ताकदीनं सरळ गोलंदाजाच्या दिशेने फटका मारला. हा चेंडू आधी गोलंदाजाला लागला आणि मग मैदानातील पंच रोहन पंडित यांच्या गुडघ्यावर जाऊन लागला. पंचांच्या वेदना पाहून दोन्ही संघातील खेळाडूंसह सामना पाहणाऱ्यांमध्ये काही काळासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक उपचारानंतर पंच पुन्हा आपली जबाबदारी स्वीकारायला सज्ज झाले.

Comments
Add Comment