पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन पक्षासाठी समर्पितपणे काम करणारा मोठा वर्ग आजही काँग्रेसमध्ये आहे. त्याला काँग्रेसमधील ‘निष्ठावंत’ असे म्हणतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील अशा निष्ठावंत घराण्यांना म्हणूनच राजकीय वर्तुळात किंमत होती. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचा उल्लेख झाला, की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे घराणे डोळ्यांसमोर येते. एकेकाळचा काँग्रेसचा नांदेडचा गड आता भाजपचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखला जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनी नांदेडच्या गडावर कमळ फुलविले आहे. खासदारकी आणि आमदारकी पिता-पुत्रीकडे असल्याने काँग्रेसच्या 'हाता'ला आधार देण्यासाठी नवे नेतृत्व शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांनी एक वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला; मराठवाड्यातीलच हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ घराणे म्हणून सातव घराणे परिचित होते. विधान परिषदेच्या काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला. सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये किती अस्वस्थता पसरली, हे लपून राहिले नाही. 'निष्ठावंत' प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेशानंतर दिलेली प्रतिक्रियाही बोलकी आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जो विकासाचा रथ सुरू आहे त्यामुळे विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, 'असे त्यांनी म्हटल्याने काँग्रेसच्या निष्ठावंत घराण्यातील व्यक्तींनाही यापुढे देशात भाजपशिवाय भवितव्य नाही, असे वाटू लागले हे निश्चितच. त्यातून सर्वसामान्य तळागाळातील काँग्रेस कार्यकर्ता नक्कीच बिथरला असणार, हे अर्थातच नव्याने सांगायला नको.
देशपातळीवर देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष टिकविण्यात यश आले असले, तरी पुढील १० वर्षांत काँग्रेस सत्तेवर येईल का, याची चिंता काँग्रेसच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच नेत्यांना सतत सतावत असते. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करता येईल, एवढे संख्याबळ मिळवता आले नाही. तेव्हापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे 'काँग्रेसमुक्त भारत' होण्याची प्रकिया सुरू झालेली दिसते. त्यात वैचारिक भूमिकेत संभ्रम असल्याने बहुसंख्य हिंदू मतदार काँग्रेसपासून दुरावला. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या सोहळ्यापासून काँग्रेसने स्वत:ला वेगळे करण्याचा प्रयत्न केल्याचा फटका काँग्रेसला बसला. या सोहळ्याला हजेरी लावली, तर मुस्लीम वर्ग नाराज होईल, अशी गणिते काँग्रेसचे धुरंधर मांडत राहिले. रामजन्मभूमीचा कडवा विरोध करूनच आपण सत्तेवर येऊ शकतो, असे काँग्रेसच्या धुरिणांना वाटले. म्हणून त्यांनी न्यायालयाचे खटले कसे दीर्घकाळ चालतील, ते बघितले. न्यायालयामध्ये रामाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केल्या. मंदिर बाबराने पाडले, याला ऐतिहासिक पुरावा नाही, असा युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दहा-बारा वकिलांची फौज उभी केली आणि सोनिया गांधी जेव्हा काँग्रेसच्या सर्वेसर्वा झाल्या, त्यावेळी त्यांनी 'बाबरी ढाचा' पडल्याबद्दल मुसलमान समाजाची माफीसुद्धा मागितली; परंतु १९९२ नंतर एवढी सगळी मुस्लीमधार्जिणी भूमिका घेऊनही काँग्रेसला लोकसभेत निर्विवाद बहुमत मिळविता आले नाही, हे वास्तव आहे. काँग्रेसची हक्काची मुस्लीम मते वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांत विभागली गेली. दिल्लीत केजरीवाल, उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यादव, बिहारमध्ये नितीश कुमार, बंगालमध्ये ममता बॅनर्जी आदी मुस्लीम मतांचे ठेकेदार बनले. तरीही काँग्रेस पक्षाला मुस्लीम मते आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटते.
दलित, मुस्लीम मतांच्या राजकारणामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने मुंबईसह प्रमुख महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्धार काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. उबाठा सेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे त्यांच्यासोबत आपल्याला जाता येणार नाही, असे पोकळ कारण दिले असले, तरी मुस्लीम व्होट बँक भविष्यात आपल्या हातून जाऊ नये ही काँग्रेसची भीती आहे. जात, धर्म यांच्यात द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांबरोबर आपण जाणार नाही, असे सांगणाऱ्या मुंबई काँग्रेसने उबाठा सेनेसोबत महाराष्ट्राच्या सत्तेत येण्यासाठी कशी तडजोड केली, हे सांगत नाहीत. काँग्रेसमध्ये आता 'राम' राहिलेला नाही, याची खात्री पटल्यामुळेच मुंबई शहरातील काँग्रेसच्या निष्ठावंतापैकी एक असलेल्या मुरली देवरा यांच्या घराण्याने काँग्रेसपासून फारकत घेतली. २० वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा यांनी महायुतीतील मित्रपक्षात प्रवेश केला ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. वांद्रे येथे एक वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली ते बाबा सिद्दिकी हे काँग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. त्यांनीसुद्धा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक रवी राजा यांच्यासह चार नगरसेवकांनी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये आधीच प्रवेश केला आहे. पक्षातील निष्ठावंत एकामागोमाग भाजप आणि अन्य पक्षात प्रवेश करत असताना मुस्लीम आणि दलित मतदार आपल्या पाठिशी आहे, असा भाबडा समज करून काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा कितपत योग्य आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. त्यासाठी महापालिका निवडणुकींच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.






