भुवनेश्वर : ओडिशात संबलपूर येथे होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची परीक्षा विमानतळाच्या धावपट्टीवर घेण्याची वेळ प्रशासनावर आली. या परीक्षेचा ड्रोन व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. १६ डिसेंबर रोजी ही परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ८ हजार जण आले होते आणि पदांची संख्या १८७ इतकी होती. जमादारपाली विमानतळावर ही परीक्षा झाली. होम गार्डच्या भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार आल्याने ऐनवेळी गोंधळ उडाला. परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला. परीक्षा केंद्रांवर उपलब्ध असलेल्या खोल्यांमध्ये परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने विमानतळावरच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. परीक्षा योग्यरितीने व्हावी यासाठी प्रशासनाकडून विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर जमादारपाली विमानतळाच्या धावपट्टीवर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली. यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार आल्यानंतरही शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता ही परीक्षा पार पडली. संबलपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, १६ डिसेंबरला संबलपूरमध्ये परीक्षा आयोजित केली होती. जवळपास १० हजार अर्ज आले आणि प्रत्यक्ष परीक्षेला ८ हजारांपेक्षा जास्त उमेदवार होते. शेवटी परीक्षा वेळेत व्हावी यासाठी विमानतळावर आयोजन करण्यात आले.