Saturday, December 20, 2025

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध आई-वडिलांची क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घराच्या वाटणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक कृत्यात झाले आणि आरोपीने आपल्या जन्मदात्यांचा अत्यंत निर्घृणपणे बळी घेतला. या दुर्दैवी घटनेत नारायण गणपतराव भोसले (वय ८२) आणि विजयमाला नारायण भोसले (वय ७०) या वयोवृद्ध दांपत्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा सुनील नारायण भोसले (४८) याने आई-वडिलांवर हल्ला करताना क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्याने प्रथम बांबूच्या दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वर्मी घाव घातले. त्यानंतर विळ्याच्या पात्याने त्यांची मान चिरली आणि एवढ्यावरच न थांबता काचेच्या तुकड्याने त्यांच्या हाताच्या नसा कापून त्यांना तडफडून मरण्यास सोडून दिले. घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनील भोसले याला बेड्या ठोकल्या आहेत. या भीषण कृत्यामागील कारणाने संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे. हुपरीमध्ये भोसले कुटुंबाचा दीड गुंठ्याचा एक प्लॉट आहे. या प्लॉटमधील अर्ध्या गुंठ्याची वाटणी करून मिळावी, यासाठी आरोपी सुनील गेल्या काही दिवसांपासून आपल्या आई-वडिलांकडे तगादा लावत होता. याच जमिनीच्या हव्यासापोटी त्याने वृद्ध आई-वडिलांचा जीव घेतल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एका छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी पोटच्या मुलाने केलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

हुपरी हत्याकांडातील आरोपी मुलाचा भयानक चेहरा समोर

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी सुनील भोसले याच्याबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नारायण भोसले यांना तीन मुले आहेत. त्यांपैकी चंद्रकांत आणि संजय हे दोघे व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक आहेत आणि ते अधून-मधून आपल्या आई-वडिलांची विचारपूस करण्यासाठी गावी येत असत. मात्र, तिसरा मुलगा सुनील हा घरासमोरील एका पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहायचा. सुनीलला कशाचेही गांभीर्य नव्हते आणि तो सतत किरकोळ कारणांवरून आई-वडिलांशी वाद उकरून काढत असे. केवळ वादच नाही, तर तो आपल्या वृद्ध पालकांना अमानुषपणे शिवीगाळ आणि मारहाणही करत असे. धक्कादायक बाब म्हणजे, बरोबर महिन्यापूर्वी सुनीलने आपल्या आई-वडिलांना काठीने मारहाण केली होती आणि त्यांना जीवे मारण्याची उघड धमकी दिली होती. त्यावेळी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, मात्र सुनीलने माफी मागितल्याने आणि पोटच्या मुलाबद्दल असलेल्या मायेपोटी त्या वृद्ध माऊलींनी तक्रार देणे टाळले. आपल्या मुलावर ठेवलेला तोच विश्वास आज त्यांच्या जीवावर बेतला. ज्या मुलाला त्यांनी माफी देऊन घरात राहू दिले, त्याच मुलाने अत्यंत क्रूरपणे आपल्या जन्मदात्यांचा बळी घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

फुटलेल्या बांगड्या अन् रक्ताचा सडा

आपल्या वृद्ध आई-वडिलांचा अमानुषपणे बळी घेणारा आरोपी सुनील भोसले याने गुन्ह्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन, "मी आई-वडिलांचा खून केला आहे," अशी कबुली दिली. त्याच्या या कबुलीने पोलीसही चक्रावून गेले. मात्र, जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिथले विदारक दृश्य पाहून अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. घटनेच्या वेळी झालेला संघर्ष किती भयानक होता, हे त्या घराच्या कोनाकोपऱ्यातून दिसत होते. सुनीलने प्रथम वडिलांच्या डोक्यावर बांबूच्या दांडक्याने जोरदार प्रहार केला. हा प्रहार इतका भीषण होता की, जवळच असलेल्या शोकेस कपाटाची काच फुटून चक्काचूर झाली. संतापाने आंधळ्या झालेल्या सुनीलने त्याच फुटलेल्या काचेचे तुकडे उचलले आणि आपल्या आई-वडिलांच्या हाताच्या नसा निर्दयीपणे कापून टाकल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या वृद्ध दांपत्याने जीव वाचवण्यासाठी शेवटपर्यंत धडपड केली असावी, याची साक्ष तिथे विखुरलेल्या वस्तू देत होत्या. सर्वात हृदयद्रावक दृश्य आईच्या अंथरुणापाशी होते. तिथे मरण पावलेल्या माऊलीचे तुटलेले मंगळसूत्र आणि फुटलेल्या बांगड्यांचा खच पडला होता. रक्ताने माखलेल्या अंथरुणावर पडलेले ते सौभाग्यलेणं त्या मुलाच्या क्रूरतेची कहाणी सांगत होतं. जन्मदात्या आई-वडिलांच्या रक्ताने स्वतःचे हात माखल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी आता घटनास्थळावरून रक्ताने माखलेली काच आणि लाकडी दांडके जप्त केले असून, या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी हुपरीकरांमधून केली जात आहे.

शेजाऱ्यांनाही दिली दगड मारण्याची धमकी

हुपरी येथील महावीरनगरमध्ये वृद्ध दांपत्याची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा सुनील भोसले याने दाखवलेले वर्तन अत्यंत धक्कादायक आणि निर्विकार होते. आपल्या जन्मदात्यांचा निर्घृण खून केल्यानंतरही त्याच्या मनात कोणताही पश्चात्ताप नव्हता. उलट, खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अत्यंत थंड डोक्याने हालचाली केल्याचे समोर आले आहे. आई-वडिलांचा जीव घेतल्यानंतर सुनीलने रक्ताने माखलेले बांबूचे दांडके आणि विळ्याचे पाते बाथरूममध्ये नेले आणि ते स्वच्छ धुवून काढले. रक्ताचे डाग पुसल्यानंतर ही हत्यारं त्याने आपल्या शेडजवळील एका भिंतीच्या कोपऱ्यात लपवून ठेवली. यावरून त्याने गुन्ह्याचा पुरावा मिटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे स्पष्ट होत आहे. हे अमानुष कृत्य केल्यानंतर सुनीलने घराचे मुख्य गेट बंद केले आणि तो कोणत्याही भावनेशिवाय बाहेर बसून राहिला. घरातील ओरडण्याचा आवाज ऐकून किंवा काहीतरी अघटित घडल्याच्या संशयाने जेव्हा शेजारी मदतीसाठी पुढे आले, तेव्हा सुनीलने आपले रौद्र रूप धारण केले. जो कोणी घराच्या जवळ येईल, त्याला दगड फेकून मारण्याची धमकी तो देऊ लागला. हातात दगड घेऊन तो सर्वांवर धावून जात असल्याने, परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्याच्या या हिंसक अवतारामुळे शेजाऱ्यांपैकी कोणाचेही आत जाण्याचे धाडस झाले नाही. अखेर पोलिसांना पाचारण केल्यानंतरच या भयानक प्रकरणाचा उलगडा झाला.

मध्यस्थी करायला गेलेल्या वहिनीवरही नराधम दीराचा हल्ला

हुपरीतील महावीरनगर परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची सुरुवात एका मोठ्या आरडाओरड्याने झाली. पहाटे पावणे सहा वाजता भोसले यांच्या घरातून मदतीसाठी किंकाळ्या ऐकू येत होत्या. हा आवाज ऐकून शेजारीच राहणाऱ्या नारायण भोसले यांच्या चुलत वहिनी राजमाता भोसले यांना काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय आला. राजमाता यांनी तातडीने ही बाब नारायण भोसले यांचा मुलगा संजय याला फोन करून कळवली. घरामध्ये मोठे भांडण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नेमके काय घडतेय हे पाहण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी राजमाता भोसले या हिमतीने घराच्या दिशेने गेल्या. मात्र, आई-वडिलांच्या रक्ताने माखलेला सुनील हा त्या वेळी पूर्णपणे माथेफिरू झाला होता. राजमाता यांना पाहताच सुनीलने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याने घरातील फरशीचा एक मोठा तुकडा उचलून त्यांच्या दिशेने जोरात फेकून मारला. यावरून आरोपी सुनील भोसले हा केवळ आई-वडिलांच्याच नव्हे, तर जो कोणी आडवा येईल त्या प्रत्येकाच्या जीवावर उठला होता, हे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >