समुद्रकिनारी असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त नारळाची लागवड करावी. यामुळे नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा मिळणार आहे. कामगारांच्या रिकाम्या हातांना काम मिळणार आहे. नारळ विक्रीमुळे व्यापारी वर्ग निर्माण होणार असून नवनवीन नारळ उद्योजक निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोकणची वेगळी ओळख जगात होणार आहे.
जगामध्ये जवळजवळ ९३ देश नारळाचे उत्पादन घेतात. आपल्या महाराष्ट्र राज्यात नारळ उत्पादनाचा विचार करता राज्यात ३३ हजार हेक्टरवर नारळाचे लागवडीखाली क्षेत्र असून १७ हजार ९२९ हेक्टर सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, तर कोकणात दरवर्षी अंदाजे नारळाचे रुपये १८.६३ कोटींचे उत्पादन होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुपये १ हजार ४५७ लाख नारळाचे उत्पादन होत असते. ही माहिती प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी २०२३ साली दिली होती. म्हणजे अजून चांगल्या प्रकारे नारळाची लागवड केल्यास नारळाच्या उत्पादनात वाढ होऊन कोकणच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळेल.
आज नारळाचा विचार केल्यास नारळाच्या उत्पादनात घट होऊन नारळाच्या किमती जवळजवळ तिप्पट झालेल्या दिसत आहेत. तर नारळाच्या तेलाची किंमत रुपये ६०० प्रति लिटर झाली आहे. याला कारण रोगराई, बदलते हवामान, अपुरे पाणी आणि माकडांचा वावर होय. असे असले तरी कोकणात चांगले नारळाचे उत्पादन होते. तेव्हा नारळ उत्पादनाकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहिल्यास उत्तम प्रकारे बळ कोकणच्या अर्थव्यवस्थेला मिळू शकते. त्यासाठी योग्य प्रकारे नारळाची लागवड करायला हवी. म्हणजे नारळाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे कोकणच्या उत्पन्नात अधिक चांगल्याप्रकारे वाढ होऊ शकते. तेव्हा नारळ कितीही महाग झाला तरी कोकणी माणूस खोबऱ्याशिवाय जेवण करीत नाही. नारळाचा विचार केल्यास अनेक लोकांचा संसार नारळाच्या व्यवसायावर अवलंबून असतो. सध्यातरी हा व्यवसाय कोकणात शेतकऱ्यांचा पूरक जोडधंदा म्हणून ओळखला जातो. काही शेतकरी शेतीच्या बाजूने नारळाची रोपे लावतात. काहींची तर नारळाची स्वतंत्र बाग आहे. एक माड जरी असला तरी त्याचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो. तेव्हा नारळाच्या व्यवसायामुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी नारळाची अधिक प्रमाणात लागवड करणे गरजेचे आहे. आपण नारळ जरी म्हणालो असलो तरी त्याच्या विविध भागांचा उपयोग नागरिकांच्या उपयोगासाठी होत असतो. त्यामुळे नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात. असे आपण प्राथमिक शाळेत शिकलो आहोत. तेव्हा नारळाच्या झाडाचे योग्य प्रकारे संगोपन आपल्याला करावे लागेल. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. आता आपण नारळाच्या झाडांच्या विविध भागांचा उपयोग कसा केला जातो किंवा नागरिकांना होतो याविषयी माहिती घेऊ. त्यामुळे नारळाच्या झाडाला खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष म्हणतात हे वाचक वर्गाच्या लक्षात येईल.
घाटमाथ्यावर आवडीने शेंगदाणे जेवणात वापरतात त्याप्रमाणे कोकणात ओल्या खोबऱ्याचा जेवणात वापर केला जातो. कोवळ्या नारळाचे पाणी लोक आवडीने पितात. कोकणात त्याला शहाळे असेही म्हणतात. खोबऱ्यापासून तेल व दुधसुद्धा तयार करतात. तेल काढल्याने सुखी पेंडसुद्धा मिळते. करवंटीचा वापर डवली व कोळशासाठी केला जातो. नारळ सोलल्यानंतर त्यांची सोडणा मिळतात ती पाण्यात फुगत घातली जातात. त्यानंतर त्याचा काथ्या तयार केला जातो. त्यापासून दोरी, ब्रश, जाळी, चटई इत्यादी वस्तू तयार केले जातात. नारळाच्या पानापासून सुंदर छप्पर किंवा जाळी बनवली जातात. त्याच्या हिरापासून झाडू बनवितात. हिराच्या झाडूलासुद्धा बाजार पेठेत बऱ्यापैकी मागणी असते. नारळाचे जे खोड असते त्यापासून घरासाठी वासे तयार केले जात असून आकर्षक फर्निचरसुद्धा तयार करतात. कोकणात खाडीशेजारी जी बैठी घरे आहेत त्यांना सर्रास माडाचे वासे दिसतील. खारी हवा असल्यामुळे वासेसुद्धा जास्त दिवस टिकतात. तेव्हा नारळाचा विचार केल्यास शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेतीला जोडधंदा आहे. तसेच उपजीविकेचे प्रमुख साधन आहे असे म्हणावे लागेल.
कोकणात नदी-नाल्यांच्या कडेला, खाडी व समुद्राच्या काठावर डोलणारी नारळाची झाडे दिसतील तशी त्याची काळजीसुद्धा घेतली जाते. विशेष म्हणजे खारी हवा नारळाला पोषक असते. समुद्र किंवा खाडीच्या कडेला जी नारळाची झाडे डोलताना पाहिल्यावर कल्पना येते. तेव्हा सध्याच्या काळात नारळाची किंमत विचारात घेता नारळाची लागवड करणे फायदेशीर ठरणार आहे. नारळाच्या बटू व उंच जातीचा विचार केल्यास बटू जात ३ ते ५ वर्षांत, तर उंच जाती ५ वर्षांनंतर नारळ धरायला लागतात. बटू नारळाला कमी, तर उंच नारळाला जास्त आयुष्य असते. माडाला नारळ लागल्यावर जवळजवळ ९ महिन्यांत नारळ परिपक्व होतात. मात्र त्या आधी सुद्धा नारळ काढू शकतो. जमीन, योग्य खत, पाणी आणि माडाची काळजी घेतल्यास नारळाचे उत्पादन वाढण्याला मदत होते. आज जे शेतकरी संकटात आहेत त्यांनी नारळाची लागवड बिनधास्तपणे करावी. आजच्या घडीला कोकणात शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.
समुद्र किनारी असलेल्या नागरिकांनी जास्तीत जास्त नारळाची लागवड करावी. यामुळे नारळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा मिळणार आहे. कामगारांच्या रिकाम्या हातांना काम मिळणार आहे. नारळ विक्रीमुळे व्यापारी वर्ग निर्माण होणार असून नवनवीन नारळ उद्योजक निर्माण होणार आहेत. त्यामुळे कोकणची वेगळी ओळख जगात होणार आहे. त्यासाठी केवळ घरापुरते नारळाचे उत्पादन न करता व्यावसायिक दृष्टिकोनातून नारळाच्या उत्पादनाकडे कोकणवासीयांनी पाहावे. तसेच शासन स्तरावर नुकसानग्रस्त नारळ बागायतदारांना योग्य सुरक्षा विमा कवच आणि नारळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन वेळीच दिले गेले पाहिजे. त्यामुळे नारळ लागवडीतून कोकणच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळ मिळेल हे मात्र निश्चित.
- रवींद्र तांबे