नवी दिल्ली : भारताला घेरण्यासाठी चीनने पाकिस्ताननंतर आपले लक्ष आता बांगलादेशवर केंद्रित केले आहे. बांगलादेशामध्ये चीनकडून लष्करी व पायाभूत सुविधांचा पायपसारा वाढवण्यात येत आहे. लालमोनिरहाट एअरबेस, पेकुआ येथील पाणबुडी तळ आणि मोंगला बंदराचा विस्तार चीनकडून करण्यात येत असल्याने भारताच्या ईशान्य भागाशी जोडणाऱ्या संवेदनशील सिलिगुडी कॉरिडोरवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत-बांगलादेश संबंधातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संसदेसमोर सादर करण्यात आलेल्या परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी समितीच्या अहवालातून हे सामरिक वास्तव समोर आले आहे.
बांगलादेशमध्ये चीनचा वाढता लष्करी व पायाभूत पायपसारा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे समितीने आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. लालमोनिरहाट एअरबेस, पेकुआ येथील पाणबुडी तळ आणि मोंगला बंदराच्या विस्तारामुळे भारताच्या ईशान्य भागाशी जोडणाऱ्या संवेदनशील सिलिगुडी कॉरिडोरवर थेट परिणाम होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आणि मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आले. तेव्हापासून भारत-बांगला देश संबंधांमध्ये तणाव वाढत गेला आहे. भारत-बांगला देश संबंधांचे भविष्य या संसदीय समितीच्या अहवालात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवण्यात आले आहे. भारताने बांगला देशी राजदूतांना पाचारण करून देशातील ढासळलेल्या सुरक्षा परिस्थितीबाबत सांगितले.
भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किलोमीटर अंतरावर हवाईतळ
समितीच्या अहवालानुसार, चीन बांगलादेशच्या लालमोनिरहाट येथील हवाईदलाच्या धावपट्टीच्या विकासात सक्रिय आहे. विशेष बाब म्हणजे, हा एअरबेस भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असून, तो सिलिगुडी कॉरिडोरच्या कक्षेत येतो. सिलिगुडीपासून या एअरबेसचे अंतर सुमारे ७० किलोमीटरपेक्षा कमी आहे. भूतान व भारताच्या सीमेवरील चिनी हालचालींच्या पार्श्वभूमीवर या एअरबेसचे सामरिक महत्त्व अधिकच वाढते. यासंदर्भात बांगला देश सैन्याच्या लष्करी संचालन महासंचालकांनी भारताला स्पष्टीकरण दिले असून, सध्या या धावपट्टीचा लष्करी वापरासाठी विस्तार करण्याची कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आठ पाणबुड्यांचे तळ
अहवालात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून, चीनने बांगलादेशातील पेकुआ येथे अत्याधुनिक पाणबुडी तळ उभारल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तळावर किमान ८ पाणबुड्या ठेवण्याची क्षमता आहे, तर बांगलादेश नौदलाकडे सध्या केवळ दोनच पाणबुड्या आहेत. यामुळे हा तळ केवळ बांगलादेशापुरता मर्यादित नसून, चीनच्या दीर्घकालीन सामरिक उद्दिष्टांचा भाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.






