मुंबई : सध्या सर्वत्र धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची विक्रमी कमाई, रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक आणि शरारत या गाण्याची लोकप्रियता यामुळे धुरंधर सतत चर्चेत आहे. आता हीच चर्चा देशाबाहेरही पोहोचली असून थेट हॉलिवूडपर्यंत धुरंधरची भूरळ पडल्याचं पाहायला मिळत आहे.
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध गायक निक जोनस याने आपल्या भावांसोबत आणि जोनस ब्रदर्स बँडसह एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये निक आणि त्याचे भाऊ धुरंधर चित्रपटातील शरारत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये निक जोनस शरारत गाण्याच्या तालावर हात वर करत डान्स करताना दिसतो, तर त्याच्या मागे त्याचे भाऊही त्याच जोशात थिरकत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना निक जोनसने कॅप्शनमध्ये नवा प्री शो हाइप साँग अनलॉक झाला आहे, असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
उल्लेखनीय बाब म्हणजे शरारत हे गाणे मधुबंती बागची आणि जॅस्मिन सँडलस यांनी गायले असून शाश्वत सचदेव यांनी त्याला संगीत दिलं आहे. या गाण्यात क्रिस्टल डिसूजा आणि आयशा खान यांचा दमदार डान्स पाहायला मिळत आहे. निक जोनसचा हा व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी निकला नॅशनल जीजू म्हणत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, धुरंधर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यांत ४६०.२५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.






