ढाका : बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, दीपूची बेदम मारहाण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर 'रॅपिड ॲक्शन बटालियन'ने मयमनसिंहच्या विविध भागात समन्वित छापे टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद लिमोन सरकार (१९), मोहम्मद तारिक हुसैन (१९), मोहम्मद माणिक मियां (२०), इरशाद अली (३९), निजुम उद्दीन (२०), आलमगीर हुसैन (३८) आणि मोहम्मद मिराज हुसैन एकॉन (४६) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजूनही सुरू आहे.