Friday, December 19, 2025

बांगलादेशात हिंसाचार उफाळला! इन्कलाब मंचचे प्रवक्ते हादी यांच्या मृत्यूमुळे देशाला दंगलीचे स्वरूप

बांगलादेशात हिंसाचार उफाळला! इन्कलाब मंचचे प्रवक्ते हादी यांच्या मृत्यूमुळे देशाला दंगलीचे स्वरूप

बांगलादेश: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करणाऱ्या युवा चळवळीतील प्रमुख नेत्याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. गेल्या आठवड्यात ढाका येथील मशिदीतून बाहेर पडताना शरीफ उस्मान हादी यांच्यावर मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान गुरुवारी (१८ डिसेंबर) सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशाला दंगलीचे स्वरूप आले आहे.

या प्रकरणात मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. तसेच एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. हादी यांच्या मृत्यूची बातमी देशभरात पसरताच, निदर्शक शाहबागमध्ये जमले आणि वाहतूक रोखली. तसेच हादीला न्याय मिळावा अशी मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी निदर्शकांनी अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करत घोषणाबाजी केली.

दरम्यान, राजशाही विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोठा निषेध मोर्चा काढल्यानंतर राजशाही शहरात तणाव निर्माण झाला. विद्यापीठ कॅम्पसपासून सुरू झालेले हे निदर्शने अखेर शहराच्या मध्यभागी पोहोचताच बंदी घातलेल्या अवामी लीग पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तसेच निदर्शकांनी बांगलादेशातील प्रमुख वृत्तपत्रे द डेली स्टार आणि प्रथम अली यांच्या कार्यालयांची तोडफोड करत, एका इमारतीला आग लावली.

Comments
Add Comment