Friday, December 19, 2025

Ashish Shelar : "काँग्रेसने मारली लाथ, आता राष्ट्रवादीचे धरले..." उबाठा सेनेच्या माहिती पुस्तिकेवर आशिष शेलारांचा खोचक टोला

Ashish Shelar :

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा शिगेला पोहोचला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर कवितेच्या शैलीत घणाघाती टीका केली आहे. "ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम?" अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

केलेली कामे दुर्बीण लावून शोधावी लागतात!

उद्धव ठाकरे गटाकडून सध्या मुंबईत 'पॉकेट बुक' (माहिती पुस्तिका) वाटप करण्यात येत आहे. यावर आक्षेप घेताना शेलार म्हणाले की, "स्वतः केलेली कामे आता तुम्हाला दुर्बीण लावून शोधावी लागत आहेत. जर तुम्ही खरंच कामं 'करून दाखवली' असतील, तर या पॉकेट बुकमध्ये विकासाऐवजी द्वेषाची पाने का लावली आहेत?" असा सवाल त्यांनी केला आहे.

हिंदुत्व आणि याकूब मेमनच्या कबरीवरून टोला

शेलार यांनी आपल्या पोस्टमधून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसने लाथ मारल्यानंतर आता उबाठा गट राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या दारात पदर पसरून उभा आहे, अशी टीका त्यांनी केली. "आम्ही सदैव सांगत होतो की हिंदुत्वाची कदर करा, पण तुम्ही मात्र याकूब मेमनची कबर सजवली," असे म्हणत शेलारांनी जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत.

विरोधी पक्षांच्या स्थितीवर भाष्य

महाविकास आघाडीतील विसंवादावर बोट ठेवताना आशिष शेलार म्हणाले की, अंगात बळ नसताना काँग्रेस स्वबळाची भाषा करत आहे, तर तथाकथित 'मर्दांचा पक्ष' म्हणवून घेणाऱ्यांना आता मनसेच्या पांगुळगाड्याची आशा लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >