Sunday, January 25, 2026

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक नोंदणी व माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर रविकिरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेसाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टलवरील  https://prematric.mahait.org/Login/Login  लॉगिनद्वारे शाळेची नोंदणी करणे आवश्यक आहे. प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्ज नोंदणी करताना मुख्याध्यापकांनी  Pre_SE27XXXXXXXXX_Principal  हा युजर आयडी व Pass@123 हा पासवर्ड वापरून लॉगिन करावे. त्यानंतर शाळेचे प्रोफाइल, मुख्याध्यापक व लिपिकांची माहिती तसेच विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी.

विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहेत, त्या संबंधित शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान काही अडचणी उद्भवल्यास संबंधितांनी लेखी स्वरूपात कळवावे अथवा astdirmumcityvint@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी यांनी विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन करून अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सहकार्य करावे. एकही पात्र विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Comments
Add Comment