मोहित सोमण
व्यवसायात साधना महत्वाची असते. स्वतः मधील व्यक्तिमत्वाची शारिरिक, मानसिक काळजी ही देखील आध्यत्मिक साधना असते. व्यक्तिमत्त्व सुधरूढ ठेवतो तोपर्यंत माणूस थकत नाही. माणूस थकला नाही की सार्वजनिक आयुष्यात खचत नाही. असेच एक उदाहरण म्हणजे माजी ज्येष्ठ नेते मंत्री व स्वातंत्र्यसैनिक म्हणून ज्यांची ओळख केले जाणारे व वयाची १०० री उलटवून आता स्वर्गलोकात जाणारे बी जे खटाळ पाटील (दादा) हे आता या जगात नाहीत पण त्यांच्याशी झालेली १० मिनिटाची भेट प्रेरणादायक ठरली. एका इंग्रजी वृत्तपत्रात काम करत असताना आमच्या प्रकाशनाचा खासगी बक्षीस सोहळा होता. रिपोर्टर असतानाही माझ्याकडे मान्यवर उपस्थित पाहुण्यांच्या आदरतिथ्याची जबाबदारी दिली होती. इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज त्यावेळी हजर होते. तेव्हा दादांना जीवनगौरव पुरस्कार आमच्या प्रकाशनाने दिला होता.
साधारण ९९ वर्षा वय पांढरी टोपी, पांढरा सदरा, साधे धोतर असा पेहराव असलेले दादा आपल्या परिवारासह नरिमन पॉईंट येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आपल्या कारमधून उतरले. त्यांच्यातील तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून मी थबकलो. डोळ्यात वेगळीच चमक होती. वेगळेच तेज होते जे शब्दात सांगणे कठीण आहे. आयुष्यातील नव्वदी ओलांडून गेले असले तरी दादा १७ वर्षीय तरुणांसारखे टवटवीत होते. त्यांना आम्ही बक्षिस स्विकारण्यासाठी घेऊन गेलो त्यांना घरातून निघण्यास उशीर झाल्याने ते कार्यक्रमाच्या मध्यांतरात आले होते. अर्थात मी कामाच्या गडबडीत दुसऱ्या कामास लागलो पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य एक अर्थाने सुखद धक्का देत होते.
आताच्या जेन झी पीढीला दादा माहिती पण नसतील पण कधी गुगल केले तर कदाचित काही झलक कळेल. दादांचा जन्म २६ मार्च १९१९ साली संगमनेर अहमदनगर जिल्ह्यात झाला. ते केवळ राजकारणी नव्हते लेखक होते वक्ते होते विचारवंत होते स्वातंत्र्य सैनिक होते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या होत्या. ३५ वर्ष राजकारणात काढली असताना २० वर्षांहून अधिक काळ ते आमदार कॅबिनेट मंत्री अशा विविध महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले. त्यांनी १९८० साली झालेल्या निवडणुकीतच १९८५ हे माझे निवृत्तीचे वर्ष असेल असे घोषित करून टाकले आणि तसे केलेही....
१९८० सालच्या निवडणूकीत त्यांनी दणदणीत मतांनी विजय मिळवत संगमनेरमधून आमदार झाले. ती त्यांची शेवटची आमदारकी.आयुष्यात लोकांसाठी आयुष्य घालवल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्यात विद्या,कला, आरोग्य या क्षेत्रात कार्य केले. ते ही अखेरच्या श्वासापर्यंत. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना पुण्याच्या महाविद्यालयात त्यांनी एलएलबी, एलएलएस अशा पदव्युत्तर शिक्षण घेऊन वकिली केली नसली तरी आपली वैचारिक बैठक पक्की केली.
त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत महत्वाचे पोर्टफोलिओ व मंत्रीपदे सांभाळली पण दादा बदलले नाहीत. एक रूपयाचा देखील भ्रष्टाचार या व्यक्तीने केला नसेल हे त्यांच्याशी बोलतानाच मला लक्षात आले.चेहऱ्यावरील तेज खूप काही सांगून गेले. आयुष्यात तत्वापुढे आणखी काही मोठी नाही या विचारासाठी प्रसिद्ध होते. असे जुनेजाणते लोक देखील सांगतात. मी त्यांना एकदाच भेटलो त्यामुळे वैयक्तिक आयुष्याची मला कल्पना नाही पण त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे परिवार, नातवंडे, पत्नी,सुना ज्या पद्धतीने दादांचा परिचय अथवा त्यांची काळजी घेत होत्या त्यातून त्यांचे महत्व विशद झालच.
साधारण मार्च २०१८ चा तो दिवस होता. संध्याकाळीही उष्णता खूप होती. दादा ९९ वर्षाचे असताना कारमधून पुणे ते मुंबई प्रवास करून आले होते. त्यानंतर त्यांना जीवनगौरव मिळाल्यानंतर त्यांच्याशी माझे केवळ १० मिनिटे बोलणे झाले पण माझे वैचारिक आयुष्य बदलून गेले. त्यांनी बोलताना तु काय करतोस ? असा प्रश्न विचारल्यानंतर मी माझा परिचय करून दिला. ९९ वर्षांचे असताना त्यांचा आवाज खणखणीत होता. मी तत्वासाठी वेळप्रसंगी आमदारकीचाही राजीनामा द्यायला तयार होतो असे त्यांनी सांगितले. कारण होते ते माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले (अब्दुल रहमान अंतुले) सिमेंट घोटाळा प्रकरण...कोकणातील पहिले व पहिले मुस्लिम मुख्यमंत्री म्हणून ज्यांची बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न व औषध प्रशासन मंत्री होते. कॅबिनेटमध्ये सर्वात ज्येष्ठ व अनुभवी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांना सगळेच मंत्रीमंडळ असो जनता मानत असत. अंतुले यांच्या सिमेंट प्रकरणात त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले गेले.
परंतु प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांनी घोषित केल्याप्रमाणे १९८५ साली वयाच्या ६१ वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली. नंतर चौकशी आयोगात अंतुले निर्दोष सिद्ध झाले हा भाग वेगळा. यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण अशा एकाहून एक मातब्बर मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केले.
दादांनी आयुष्यात कधीही भष्टाचार केला नाही अथवा खपवून घेतला नाही. सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या दादांना शेतकरी, कष्टकरी यांची जाण होती. त्यामुळे ते कधीही 'उद्योगपती' चे नेते म्हणून मिरवले गेले नाहीत. काँग्रेस मधील चुकीच्या पायंडावर ते बोलायला कमी करायचे नाहीत. त्यांनी आयुष्यात अनेक लिखाण केले, भाषणे केली, अंतरीचे धावे, दिंडा, गांधींची असते तर, लष्करी विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक, गुलामगिरी अशी अनेक पुस्तके लिहिली. विशेष म्हणजे वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांचे अंतरीचे धावे हे पुस्तक प्रकाशित झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिण्यास सुरूवात केली होती परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही.
इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस संकृतीत रूजले गेले तरी ते त्यांचा 'निष्कलंक' व गांधीवाद अबाधित होता. दादा त्यांच्या आयुष्यात कधीही खोटे बोलले नाही हे मी व्यक्तिशः ऐकले आहे. निवृत्तीनंतर दादांनी राजकारणातून संन्यास घेतला तरी त्यांनी कला, साहित्य, संस्कृती यांचा अधिवास कायम ठेवल्याने त्यांनी पुढील आयुष्य आरोग्यदायी व सुखात घालवले होते. ज्ञानाची आराधना करताना त्यांनी आरोग्याला महत्व दिले. तपश्चर्या करताना त्यांनी योग, विपश्यना याला बहुरंगी बहुढंगी महत्व दिले् परिणामी त्यांना दीर्घायुष्य मिळाले. दादा जिथे असतील तिथे सुखात असतील.
ही आठवण सांगण्याचा दृष्टीकोन म्हणजे हल्ली साधना हा दुर्मिळ प्रकार झाला आहे. संसार प्रपंच, शिक्षण, नोकरी, लग्न, मुंज, विधी, व्यवसाय या त्रिकालाबाधित सत्याकडे माणूस इतका झुकला गेलाय की त्याला परमात्म्याच्या आनंद घेणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे व्यवसाय, नोकरी यांची व्यक्तिगत आयुष्याची सागंड घालताना छंद अथवा सवय म्हणून का होईना साधना महत्वाची आहे मनःशांती महत्वाची आहे.
हीच दरी पूर्ण करण्यासाठी आरोग्य व साधना महत्वाची भूमिका पार पाडते. विपश्यना करण्यासाठी दादा नेहमी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात जात असत. समाजाची सेवा केल्यानंतर आपल्या जन्माचे उद्दीष्टे व सार्थक जाणून घेण्यासाठी त्यांना कलेची, विपश्यनेला आपला आधार बनवला.
या विपश्यनेचा आणखी काय फायदा होतो त्याचे उदाहरण आहे. २०१४ साली कोणीतरी समाजमाध्यमातून त्यांच्या मरणाची बातमी व अफवा पसरवली.२०१४ मध्ये, महाराष्ट्र सरकारच्या कोषागार विभागाने मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या खोट्या फोननंतर त्यांना मृत घोषित केले. जबाबदारीवरील पदावर काम केलेल्या नेत्याला व स्वातंत्र्यसैनिकाला जिवंतपणी मृत कसे घोषित केले जाऊ शकते यावरून मोठा वादंग झाला तरीही न चिडता त्यांनी सगळ्यांना माफ करून टाकले. हे होते दादा...
साधारणतः वयाच्या अखेरच्या टप्प्यात माणसे चिडचिडी होतात. दादा तसे झाले नाहीत. उलट नवं तारूण्यसारखे खुलत गेले. जगभरातील अनेक नेत्यांना वयाच्या वृद्धापकाळातही खुर्चीची लालसा असते. दादांनी हे काम कधी केले नाही. हीच समर्पण वृत्ती त्यांचा साधनेतून व व्यासंगातून आली. त्यांनी सर्वांना केवळ माफ केले नाही तर यांनी अशा मानवी चुका होऊ शकतात असे म्हणत हा वाद मिटवला. त्यांनी या गैरप्रकारासाठी जबाबदार असलेल्या लोकांना माफ करण्याची उच्च अधिकाऱ्यांना विनंती केली होती. हे दादांचे मोठेपण होते. आज अशी किती लोक जगात आहेत?
त्यामुळे व्यवसायिक असो, विद्यार्थी असो, नेत असो मंत्री असो व्यापारी असो अथवा कुणीही असो वैयक्तिक व व्यवसायिक आयुष्य यांची सांगड घालता यायला हवी त्यामुळे आरोग्य सुधरूढ होते मन प्रसन्न राहते मन प्रसन्न राहिले तर व्यवसाय खुलतो, समाज मन प्रसन्न राहते. अशा विविध प्रकिया या एकमेकांवर अवलंबून आहेत हे मला त्या दिवशी दादांना भेटल्यावर जाणवले. त्या १० मिनिटांच्या भेटीत खूप शिकायला मिळाले आजही ते गाडीत बसताना केलेले 'अच्छा' मला आजही आठवतो.
एक दिवस बातमी आली दादा गेले बस... मन सुन्न झाले. पण आयुष्यात पुढे जायलाच हवे. पण जाताना ते जगण्याचा मंत्र देऊन गेले. समाजालाही त्यांनी आनंदी जगायला शिकवले आरोग्याची महत्व पटवून दिले अशा दादांना मनापासून प्रेम व भावपूर्ण श्रद्धांजली. मी स्वतः ला 'लकी' म्हणतो कारण मला दादांना भेटण्याची संधी मिळाली आजच्या पिढीला दादा क्वचितच माहिती असतील म्हणून लिहिण्याचा प्रपंच....
आपली नोकरी व्यवसाय करताना दादांचा मंत्र लोकांनी अंगिकारावा एवढाच संदेश द्यायचा होता तो लोकांना समर्पक वाटला तरी लिहिण्याचे श्रम साफल्य मिळाले असे मी जिवंतपणे म्हणेन.
(वरील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत या लेखातील विचारांचा आणि प्रकाशनाचा काहीही संबंध नाही अथवा प्रकाशनाचे संबंधित मत नाही याची नोंद कृपया नोंद घ्यावी)






