सिंगापूर : भारतीय नागरिक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत सिंगापूर पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या तर्कवितर्कांची दखल घेत सिंगापूर पोलिस दलाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सिंगापूर पोलिस दलाच्या माहितीनुसार, जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सिंगापूर कोरोनर्स अॅक्ट २०१० अंतर्गत सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या तपासात कोणताही घातपात किंवा गुन्हेगारी कट आढळून आलेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारतातील माध्यमांमध्ये या प्रकरणी विशेष तपास पथकाने चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी सिंगापूर पोलिसांकडून सध्या कोणताही संशयास्पद प्रकार नोंदवण्यात आलेला नाही.
सिंगापूर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल राज्य कोरोनरकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनर इन्क्वायरी घेण्यात येणार असून ही प्रक्रिया मृत्यूचे कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी असते. ही चौकशी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार असून त्याचा निष्कर्ष सार्वजनिक केला जाणार आहे.
सिंगापूर पोलिस दलाने या प्रकरणाचा सखोल आणि व्यावसायिक पद्धतीने तपास केला जात असल्याचे नमूद करत नागरिकांना अप्रमाणित माहिती पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.






