माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. अजित पवार यांनी गुरुवारी तो स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिल्याने, त्यांच्या अडचणीत वाढ झाली. कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने, त्यांच्याकडील खाते काढून घेण्याची शिफारस बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली. त्यानुसार, कोकाटे यांच्याकडील खाते काढून ते अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर, गुरुवारी कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती अजित पवार यांनी समाज माध्यमांद्वारे दिली.
न्यायालयाच्या निकालानंतर राजीनामा - अजित पवार
याविषयी अजित पवार म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. कोकाटे यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर शुक्रवारी (दि. १९ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.






