मुंबई : नाशिकमधील (Nashik News) बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली असून त्यांचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांच्यावर असलेली अटकेची टांगती तलवार आता टळली आहे.
मुंबई : नाशिकच्या १९९५ मधील बहुचर्चित गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे ...
नेमके प्रकरण काय?
१९९५ च्या गृहनिर्माण घोटाळा (सदनिका प्रकरण) संदर्भात नाशिकच्या न्यायालयाने नुकताच निकाल दिला होता. या प्रकरणात कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालानंतर कोकाटे हे न्यायालयासमोर हजर न झाल्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात कडक अटक वॉरंट जारी केले होते. पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, कोकाटे यांनी या वॉरंटला आव्हान देत तातडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयात आज या अर्जावर सविस्तर सुनावणी झाली. कोकाटे यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू आणि प्रकरणाची पार्श्वभूमी विचारात घेत न्यायालयाने कोकाटे यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नाशिक पोलिसांच्या अटकेची कारवाई आता थांबली आहे. तूर्तास कोकाटे यांना न्यायालयाकडून जीवदान मिळाले असले, तरी मूळ शिक्षेच्या विरोधातील त्यांची न्यायालयीन लढाई यापुढेही सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे कोकाटे समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.