लोकप्रिय विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना पुन्हा एकदा पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. भारतीने आज (१९ डिसेंबर) एका गोंडस बाळाला जन्म दिला असून लिंबाचिया कुटुंबाचा वंश वाढला आहे.'लाफ्टर शेफ्स सीझन ३'च्या सेटवर शूटिंग करत असताना भारतीला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तिने एका निरोगी, गोंडस बाळाला जन्म दिला असून भारती आणि तिचे बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
भारती आणि हर्ष या जोडप्याला आधीच लक्ष उर्फ गोला नावाचा तीन वर्षांचा मुलगा आहे. मात्र भारती आणि हर्ष यांना यावेळी मुलीची इच्छा होती. पण त्यांना पुन्हा एकदा मुलगा झाला आहे. तरी संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तसेच भारती आणि हर्षच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे. दरम्यान गरोदरपणातून ती सुंदर सुंदर फोटोशूट करून आपले आईपण साजरे करताना दिसत होती.
अलीकडेच भारती म्हणाली की,अतिरिक्त वजन कमी केल्यामुळे तिला आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यास मदत झाली असून नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याचा तिचा आत्मविश्वास वाढला. तिच्या एका व्लॉगमध्ये, भारती ने एक गोड क्षण शेअर केला आणि तिच्या चाहत्यांना सांगितले की, तिचा मुलगा गोलाने त्याच्या लहान भावंडासाठी आधीच एक टोपणनाव निवडले आहे.
हर्ष आणि भारतीची या दोघांची भेट २००९ मध्ये 'कॉमेडी सर्कस'च्या सेटवर झाली आणि अखेरीस त्यांनी २०१७ मध्ये लग्न केले. भारती आणि हर्ष 'हुनरबाज: देश की शान','खतरा खतरा खतरा','हम तुम और देम' आणि 'लाफ्टर शेफ्स' सारख्या कार्यक्रमांमधील त्यांच्या कामासाठी लोकप्रिय आहेत.






