Friday, December 19, 2025

माजी मंत्री माणिकराव कोकाटेंवर होणार अँजिओग्राफी, सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

माजी मंत्री माणिकराव कोकाटेंवर होणार अँजिओग्राफी, सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई: बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी (१८ डिसेंबर) आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. आता त्यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्यांची पत्नी सीमा आणि मुलगी सीमंतिनी लीलावती रुग्णालयात उपस्थित झाल्याचे सुद्धा समजते आहे.

दरम्यान शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षे कारावास आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती. मात्र या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी त्यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आज दुपारी तीन वाजता याप्रकरणी न्यायमूर्ती लड्डा यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी होणार आहे. आज त्यांना दिलासा मिळतो की शिक्षा कायम राहते, यावर कोकाटेंच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून आहे.

काय आहे सदनिका प्रकरण

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >