वार्तापत्र : मराठवाडा
सरत्या वर्षाअखेर मराठवाड्याच्या बाबतीत दोन आनंद वार्ता समोर आल्या. या दोन्हीही वार्ता मराठवाड्याचा कायापालट करू शकतात. पहिली म्हणजे लातूर ते कल्याण-मुंबई हा नवीन रस्ता चार ते पाच तासांत मराठवाडा ते मुंबई जोडणारा एक प्रगतिशील मार्ग ठरणार आहे. दुसरा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गे पुणे. हा नवीन रस्ता केवळ दोन तासांत पुणे-संभाजीनगर अंतर पार करणार आहे.
मराठवाड्यातील लातूर-कल्याण-मुंबई असा द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या द्रुतगती महामार्गामुळे लातूर ते मुंबई हा प्रवास केवळ चार ते पाच तासांत शक्य होणार आहे. याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्याच्या बाबतीत आणखी एक आनंद वार्ता दिली. छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर १६,३१८ कोटी रुपयांचा नवीन एक्स्प्रेस वे बांधला जाणार आहे. यातील पहिला टप्पा पुणे-अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर असा असणार आहे. या मार्गाची दुरुस्ती आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुसरा मार्ग हा शिक्रापूर ते अहिल्यानगर बाहेरून बीड जिल्ह्यातून काढण्यात येणार आहे. त्या मार्गावर फक्त टोलचे काम शिल्लक राहिले आहे. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर अडीच ते पावणेतीन तासांत शक्य होणार आहे. भविष्यात मराठवाड्याचा कायापालट करणारे हे दोन मोठे प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची गरज आहे. विदर्भातील हे दोन्ही नेते मराठवाड्याला पावले आहेत. प्रत्यक्षात मराठवाड्यात असणाऱ्या खंडीभर नेत्यांच्या डोक्यातही न येणारी कल्पना नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखविली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत मराठवाड्यात शब्दरूपी गौरव होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘रोडकरी’ असे म्हटले जाते. ते या रूपाने नक्कीच दिलेला शब्द पूर्ण करतील, असे मानले जाते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द हा मराठवाड्यासाठी अंतिम ठरणार आहे. या दोन्ही नेत्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे मराठवाड्यात मोठे कौतुक केले जात आहे.
सरत्या वर्षाअखेर मराठवाड्याच्या बाबतीत दोन आनंद वार्ता समोर आल्या. या दोन्हीही वार्ता मराठवाड्याचा कायापालट करू शकतात. पहिली म्हणजे लातूर ते कल्याण-मुंबई हा नवीन रस्ता चार ते पाच तासांत मराठवाडा ते मुंबई जोडणारा एक प्रगतिशील मार्ग ठरणार आहे. ४४२ किलोमीटरच्या या अंतरासाठी सद्यस्थितीला दहा ते बारा तास लागतात; परंतु हा मार्ग चार ते पाच तासांवर आल्यास दळणवळणाच्या सुविधांमुळे लातूर, धाराशिव या दोन जिल्ह्यांचा औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गे पुणे. हा नवीन रस्ता केवळ दोन तासांत पुणे-संभाजीनगर अंतर पार करणार आहे. असे झाल्यास मराठवाड्यातील नागरिकांना छत्रपती संभाजीनगरवरून केवळ दोन तासांत पुणे गाठता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्ते, पूल, एक्स्प्रेस वे आणि इतर विकासकामांसाठी येत्या वर्षात दीड लाख कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. या कामांमध्ये छत्रपती संभाजीनगर ते पुणे या प्रकल्पाचाही समावेश आहे. हे दोन्ही मार्ग मराठवाड्याचा भविष्यात नक्कीच कायापालट करतील. केवळ जाहीर केल्याप्रमाणे हे दोन्ही मार्ग ठरल्यावेळेत पूर्ण झाले तर येत्या पाच वर्षांत मराठवाड्याचा प्रगतीचा आलेख उंचावणारा राहणार आहे.
कुठल्याही भागाचा विकास हा रस्ते, पाणी, वीजपुरवठा यावर अवलंबून असतो. औद्योगिक विकासासाठी या तीन गोष्टींची पूर्तता झाली की मोठे - मोठे उद्योग, व्यापार तसेच व्यवसायाच्या निमित्ताने त्या भागाचा विकास होत असतो. मुंबई-पुणे-नाशिक या मोठ्या शहरांच्या धर्तीवर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य जिल्ह्यांची अवस्था उद्योगाच्या बाबतीत केविलवाणीच आहे; परंतु भविष्यात मराठवाड्यात रस्त्यांची पुणे व मुंबईला जवळीकता निर्माण झाल्यास आपोआपच मराठवाडा हा सर्व दृष्टीने सुखदायी भाग म्हणून समोर येऊ शकतो.
यापूर्वी मराठवाड्यातील अनेक नेते केंद्रात तसे राज्यात मोठ्या पदांवर मंत्री म्हणून होते; परंतु त्यांनी मराठवाड्याचा कायापालट होईल, असा एकही निर्णय घेतला नाही; परंतु विदर्भातील नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी मराठवाड्याचा कायापालट करण्यासारखा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठवाड्यात राहून राज्यात व केंद्रात मराठवाड्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांवर प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठत आहे. विदर्भातील या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून पुणे व मुंबईला जोडणारा अतिशय जवळचा द्रुतगती महामार्ग मिळणार आहे.
यामुळे मराठवाड्यात सरत्या वर्षात जल्लोष करण्यासारखीच वेळ आहे. एकीकडे द्रुतगती महामार्ग व दुसरीकडे रेल्वेसेवा या दोन्हींमुळे परिसराचा मोठा विकास होतो. त्या दृष्टीने मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विस्तारण्यावर केंद्र व राज्य सरकारचा भर आहे. मराठवाड्यातील बीड हा जिल्हा रेल्वेसेवेच्या बाबतीत थोडा कमनशिबीच आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बीड ते वडवणी या रेल्वे मार्गावर १३२ किलोमीटर ताशी याप्रमाणे यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला फलश्रुती प्राप्त झाली आहे. या प्रकल्पातील बीड ते वडवणी या ३२ किलोमीटर लांबीच्या टप्प्याची वैधानिक सुरक्षा तपासणी नुकतीच यशस्वी झाली. या मार्गावर ताशी १३२ किलोमीटर वेगाने रेल्वे धावली. त्यामुळे आता बीडच्या पुढे वडवणीपर्यंत रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाड्याला बळ देणाऱ्या अहिल्यानगर ते बीड या १६८ किलोमीटर मार्गावर यापूर्वीच प्रवासी सेवा सुरू झाली. आता बीड ते वडवणी या टप्प्याची तपासणी पूर्ण झाल्यामुळे लवकरच या नवीन मार्गावर रेल्वे वाहतुकीसाठी परवानगी मिळणार आहे. त्यामुळे परळी वैजनाथच्या दिशेने हा प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. मराठवाड्यासाठी ही रेल्वे सेवा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. ती नवीन वर्षात मार्गी लागणार आहे.
बीड जिल्ह्याचे नेतृत्व त्या ठिकाणी रेल्वे सुविधा ओढून आणण्यात नक्कीच कमी पडले. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची तुलना करताना बीड जिल्ह्याला रेल्वेच्या सुविधा खूप कमी मिळाल्या, हे आजवरच्या कामांवरून दिसून येते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर भाजपच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा तीव्रतेने विकास होत आहे. त्याचाच फायदा मराठवाड्याला या रूपाने होत आहे. मराठवाड्यातील गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत. याचे श्रेय भाजपला तसेच यासाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येकालाच जाते. येत्या नवीन वर्षात लातूर- कल्याण या द्रुतगती महामार्गासह छत्रपती संभाजी नगर - पुणे या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली तर नवीन वर्ष मराठवाड्यासाठी शुभकारक ठरणार आहे, यामध्ये शंकाच नाही.
- डॉ. अभयकुमार दांडगे abhaydandage@gmail.com






