नवी दिल्ली : ऑनलाइन सट्टेबाजीशी संबंधित 1xBet अॅप प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीत भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह, रॉबिन उथप्पा तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
ईडीकडून करण्यात आलेल्या नव्या प्रोव्हिजनल अटॅचमेंटमध्ये युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, खासदार-अभिनेत्री मिमी चक्रवर्ती, अभिनेता अंकुश हाजरा आणि अभिनेत्री नेहा शर्मा यांचा समावेश आहे.
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये युवराज सिंह यांची सुमारे २.५ कोटी रुपये, रॉबिन उथप्पा यांची ८.२६ लाख रुपये, उर्वशी रौतेला यांची २.०२ कोटी रुपयांची मालमत्ता असून ही मालमत्ता त्यांच्या आईच्या नावावर नोंदणीकृत आहे. सोनू सूद यांची १ कोटी रुपयांची मालमत्ता, मिमी चक्रवर्ती यांची ५९ लाख रुपये, अंकुश हाजरा यांची ४७.२० लाख रुपये तर नेहा शर्मा यांची १.२६ कोटी रुपयांची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे.
ही चौकशी कथित बेकायदेशीर बेटिंग अॅप्सशी संबंधित असून या अॅप्सच्या माध्यमातून गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा तसेच मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी झाल्याचा आरोप आहे.
1xBet ही जागतिक स्तरावर ओळखली जाणारी बेटिंग कंपनी असून गेल्या १८ वर्षांपासून बेटिंग इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या प्लॅटफॉर्मवर हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्याची सुविधा उपलब्ध असून कंपनीची वेबसाइट आणि अॅप ७० भाषांमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.
आजच्या कारवाईत ईडीने एकूण ७.९३ कोटी रुपयांच्या मालमत्ता अटॅच केल्या आहेत. याआधी या प्रकरणात शिखर धवन यांच्या ४.५५ कोटी रुपये आणि सुरेश रैना यांच्या ६.६४ कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत 1xBet प्रकरणात ईडीकडून एकूण १९.०७ कोटी रुपयांच्या मालमत्ता अटॅच करण्यात आल्या आहेत.






