Friday, December 19, 2025

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची भुरळ! गेल्या २० वर्षांत सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची भुरळ! गेल्या २० वर्षांत सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा

कराची: अक्षय खन्ना, रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि सौम्या टंडन अशा तगड्या कलाकारांची फळी असलेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. 'धुरंधर' चित्रपट ६ आखाती देश आणि पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला नाही. मात्र पाकिस्तानी नागरिक हा चित्रपट मोठ्या संख्येने पायरेटेड साईट्सवरुन डाऊनलोड करुन पाहत आहेत. माध्यम अहवालानुसार, 'धुरंधर' गेल्या २० वर्षांत पाकिस्तानातील सर्वाधिक पायरेटेड करण्यात आलेला बॉलिवूड सिनेमा बनला आहे.

'धुरंधर' पाकिस्तानविरोधी सिनेमा असल्याने आखाती देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेला नाही. तर, पाकिस्तानमध्ये भारतीय कलाकार आणि चित्रपटांवर बंदी आहे, म्हणूनच हा चित्रपट तिथेही प्रदर्शित झालेला नाही. पण, सध्याची जगभरातील 'धुरंधर'ची क्रेझ पाहता या सर्व गोष्टींचा 'धुरंधर'च्या बॉक्स ऑफिसवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही. उलट पाकिस्तानमधील प्रेक्षक हा सिनेमा पायरेटेड साइट्सवरून डाऊनलोड करुन पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १२ दिवसांत पाकिस्तानमधील पायरेटेड साइट्सवरून 'धुरंधर' जवळजवळ २० लाख वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे. प्रेक्षक रणवीर सिंहचा स्पाय-थ्रिलर टॉरेंट, व्हीपीएन आणि बेकायदेशीर लिंक्सद्वारे पाहतोय. यासह, 'धुरंधर' गेल्या २० वर्षांत पाकिस्तानमधील सर्वात पायरेटेड बॉलिवूड चित्रपट बनला आहे. याबाबतीत विशेष म्हणजे रणवीर सिंहच्या चित्रपटाने शाहरुख खानच्या 'रईस" आणि '२.०' सारख्या हिट चित्रपटांना मागे टाकले आहे.

जगभरातील प्रेक्षकांना 'धुरंधर'ची भुरळ पडली आहे. 'धुरंधर' ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अॅडव्हान्स तिकीट खरेदीमध्ये करोडोंची कमाई झाली होती. तर सध्याच्या बॉक्स ऑफीस कमाईचा टप्पा ५०० करोडच्या पार गेला आहे. दरम्यान पाकिस्तानातही 'धुरंधर'ची क्रेझ पाहायला मिळतेय. पाकिस्तानात हा चित्रपट अधिकृतरित्या प्रदर्शित झाला नसल्यामुळे पाकिस्तानी प्रेक्षक अनधिकृतरित्या 'धुरंधर' पाहत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा