केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चेनंतर निर्णय
मुंबई : “पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका भाजप आणि राष्ट्रवादीची शक्तीस्थळे आहेत. दोन्ही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, तर कार्यकर्ते विरोधकांना जाऊन मिळतील आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल”, असे राजकीय विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी मांडल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी दिली. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना तटकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. धनंजय मुंडे यांच्या दिल्लीवारीबाबत विचारले असता ते म्हणाले, "या भेटीवरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत, पण त्यात तथ्य नाही. काल संध्याकाळीच माझा आणि धनंजय मुंडे यांचा फोनवर सविस्तर संवाद झाला.
मुंडे यांनी त्यांच्या एका साखर कारखान्याच्या कामासाठी आणि इतर विकासकामांसाठी अमित शाह यांच्याकडे भेटण्याची वेळ मागितली होती. विशेष म्हणजे, ही वेळ त्यांनी तब्बल एक महिन्यापूर्वीच मागितली होती आणि ती नेमकी काल मिळाली."
माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत आलेला न्यायालयाचा निकाल आणि त्यानंतर लगेचच झालेली मुंडे-शाह भेट, याचा काहीही संबंध नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "कोकाटे यांच्यावरील कारवाईचा निर्णय परवा आला आणि काल मुंडेंना भेटीची वेळ मिळाली, हा केवळ एक योगायोग आहे. या भेटीचा आणि त्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. भेटीनंतर मुंडे यांनी मला फोन करून चर्चेचा सर्व तपशील दिला आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघू नये."
युतीबाबत आढावा घेणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला विरोध असल्याच्या चर्चाही तटकरे यांनी फेटाळून लावल्या. "भाजपचा आम्हाला सोबत घ्यायला विरोध होत आहे, असे कोण म्हणाले? असे भाजपच्या कोणत्या नेतृत्वाने म्हटल्याचे मला सांगा. तसे कुणीही म्हटलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका भाजप आणि राष्ट्रवादीची शक्तीस्थळे आहेत. दोन्ही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, तर कार्यकर्ते विरोधकांना जाऊन मिळतील आणि त्याचा फायदा विरोधकांना होईल, असे राजकीय विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी मांडले. ही खरी वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे म्हटले म्हणजे, राष्ट्रवादीला विरोध आहे, असा अर्थ होत नाही. राज्यात कुठेही भाजपने राष्ट्रवादीला विरोध केलेला नाही. माझी आणि प्रफुल्ल पटेल, दोघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंशी भेट झाली. काल मुख्यमंत्र्यांसोबतही सखोल चर्चा केली. आज आणि उद्या त्यासंदर्भात आढावा घेणार आहोत. कशा पद्धतीने युती करता येईल, त्या दृष्टीकोनातून पुढील पावले उचलली जातील," असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.






