Friday, December 19, 2025

Osman Hadi : हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून ओढून आणा, अन्यथा देश ठप्प करू!" इंकलाब मंचाची धमकी, भारत-बांगलादेश संबंधांमध्ये पुन्हा तणावाचे सावट?

Osman Hadi : हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून ओढून आणा, अन्यथा देश ठप्प करू!

ढाका : बांगलादेशातील सत्तापालटाचा चेहरा आणि विद्यार्थी चळवळीचा अग्रगण्य नेता शरीफ उस्मान हादी याची सिंगापूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात माजी पंतप्रधान शेख हसीना सरकारविरुद्ध बंड पुकारण्यात हादीची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, ज्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांना आपला देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. १८ डिसेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी हादीवर अगदी जवळून गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हादीला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. हादीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी बांगलादेशात पसरताच तिथे पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला आहे. संतप्त आंदोलकांनी देशभर जाळपोळ सुरू केली असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. या हत्येच्या घटनेनंतर बांगलादेशातील 'इंकबाल मंचा'ने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ही हत्या भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या इशाऱ्यावरूनच करण्यात आल्याचा थेट आरोप मंचाने केला आहे. "शेख हसीना यांना तातडीने भारतातून बांगलादेशात आणून फासावर चढवा, अन्यथा संपूर्ण देश ठप्प करू," असा इशारा इंकबाल मंचाने दिला आहे. या धक्कादायक घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. हादीच्या हत्येचे पडसाद सीमारेषेवर उमटण्याची भीती असल्याने भारतीय सुरक्षा दलांनी भारत-बांगलादेश सीमेवर कडक बंदोबस्त तैनात केला असून, हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. बांगलादेशातील वाढत्या हिंसेमुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय स्थिती पुन्हा एकदा अस्थिर झाली आहे.

तर संपूर्ण देश ठप्प करण्याचा इशारा

गुरुवारी 'इंकलाब मंचा'ने फेसबुकच्या माध्यमातून एक अत्यंत आक्रमक पोस्ट प्रसिद्ध करत युनूस सरकारला इशारा दिला आहे. "शरीफ उस्मान हादी हे देशासाठी शहीद झाले असून त्यांनी बांगलादेशाच्या सार्वभौमत्वासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे," असे नमूद करत मंचाने हादीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर भारतातून बांगलादेशात आणून शिक्षा देण्याची मागणी केली आहे. विशेषतः माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या समर्थकांकडे रोख धरत, इंकलाब मंचाने आता देशाच्या अखंडतेसाठी निकराचा लढा देण्याची वेळ आल्याचे जाहीर केले आहे. युनूस सरकारवर दबाव वाढवताना मंचाने सज्जड दम दिला आहे की, जर या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर ढाका येथील ऐतिहासिक शाहबाग परिसरात अफाट जनसमुदाय जमवून तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनाचे लोण केवळ राजधानीतच नाही, तर संपूर्ण देशभर पसरेल आणि बांगलादेश पूर्णपणे ठप्प (Shutdown) केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या पोस्टमुळे बांगलादेशातील सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, सरकारविरोधात आणि भारताकडून शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या नव्या घडामोडींमुळे बांगलादेश पुन्हा एकदा मोठ्या अराजकतेच्या खाईत लोटला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

हा हल्ला हादीवर नाही, तर बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर

सिंगापूरमध्ये विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांची झालेली हत्या हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून, तो बांगलादेशच्या सार्वभौमत्वावर आणि अस्मितेवर झालेला थेट आघात असल्याची आक्रमक भूमिका 'इंकबाल मंचा'ने घेतली आहे. या संघटनेने केलेल्या गंभीर आरोपानुसार, हादी यांच्या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचला गेला होता. हल्लेखोर विशेषतः भारतातून सिंगापूरमध्ये दाखल झाले, त्यांनी हादी यांच्या दैनंदिन हालचालींची बारकाईने 'रेकी' केली आणि संधी मिळताच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे, हे हल्लेखोर गुन्हा केल्यानंतर पुन्हा भारताच्या सीमेत पळून गेल्याचा दावा या संघटनेने केला आहे. इंकबाल मंचाने युनूस सरकारला इशारा दिला आहे की, हे मारेकरी परकीय भूमीचा आधार घेऊन बांगलादेशच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत, ही बाब सहन केली जाणार नाही. "त्या मारेकऱ्यांना भारतातून फरफटत बांगलादेशात ओढून आणा, त्यांच्यावर इथल्या मातीत खटला चालवा आणि त्यांना अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणी देशाच्या सार्वभौमत्वाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही," अशी मागणी मंचाने केली आहे.

भारत-बांगलादेश सीमेवर युद्धासारखी परिस्थिती?

राजधानी ढाकासह देशातील अनेक मोठी शहरे हिंसेच्या आगीत होरपळत आहेत. शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या या प्रक्षोभामुळे आंदोलकांनी थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजेच प्रसारमाध्यमांवर हल्ला चढवला आहे. अनेक नामांकित वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांची तोडफोड करून ती पेटवून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या अराजकतेच्या काळात अल्पसंख्याक समुदायाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे धक्कादायक दावे समोर येत असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. शहरांमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, संतप्त जमावाने रस्त्यांवर टायर जाळून आणि बॅरिकेड्स लावून रस्ते अडवून धरले आहेत. देशभरात पसरलेल्या या हिंसेच्या लोणामुळे आता भारत-बांगलादेश सीमेवर (Border) प्रचंड तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बांगलादेशातील ही अनियंत्रित परिस्थिती पाहता, मोठ्या प्रमाणावर घुसखोरी किंवा शरणार्थींची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जरी अद्याप सीमा ओलांडल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त समोर आले नसले, तरी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) आपली गस्त वाढवली असून सीमेवर 'हाय-अलर्ट' जारी केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >