मीरा-भाईंदरमध्ये युतीची शक्यता धुसर
भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात वर्चस्वाची चुरस तीव्र झाली आहे. सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही नेते अधिकाधिक जागांची मागणी करत असल्याने भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
राज्यातील बहुतेक महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार असल्याचे भाकित नेते करत असले, तरी मीरा-भाईंदरमध्ये मात्र वेगळीच राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीत नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६१ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली होती. त्यानंतर इतर पक्षांतील चार नगरसेवक भाजपमध्ये सामील झाल्याने भाजपची संख्या ६५ वर पोहोचली आहे.
यंदा युती करायची असल्यास, मागील निवडणुकीत भाजप व शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ संबंधित पक्षांच्या वाट्याला द्यावेत आणि उर्वरित जागांची विभागणी करावी, अशी भूमिका मेहता यांनी मांडली आहे. मात्र, मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्यावेळेसारखी परिस्थिती राहिलेली नसून शहरात शिवसेनेचे वर्चस्व वाढल्याचा दावा करत ५०-५० जागावाटपाचा फॉर्म्युला पुढे केला आहे. सन्मानपूर्वक जागावाटप न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे संकेतही सरनाईक यांनी दिले आहेत.
समान वाटप झाल्यास भाजपला केवळ ४८ जागांवर समाधान मानावे लागेल, त्यामुळे या प्रस्तावाला भाजप तयार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, सरनाईक यांच्या “आम्ही भीक घेणार नाही” या विधानावरून भाजपमध्ये संताप असून, “आम्ही भीक दिलीच नाही, तर त्यांनी घेतली कुठून?” असा प्रतिप्रश्न नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला आहे. या वादामुळे दोन्ही पक्षांतील वितुष्ट अधिकच वाढले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही नेते आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने यंदाची मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.






