ढाका : बांगलादेशातील २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थी उठावाचे नेतृत्व करणारे आणि 'इंकलाब मंच'चे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे. सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर बांगलादेशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, या प्रकरणाचे धागेदोरे भारताशी जोडण्याच्या ढाका सरकारच्या प्रयत्नांमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत.
नेमकी घटना काय?
१२ डिसेंबर रोजी बांगलादेशची राजधानी ढाका येथे अज्ञात हल्लेखोरांनी शरीफ उस्मान हादी यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांच्यावर ढाका मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर एव्हरकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना गेल्या आठवड्यात विमानाने सिंगापूर जनरल हॉस्पिटलच्या 'न्यूरोसर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट'मध्ये हलवण्यात आले होते. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून हादी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. आता त्यांचा मृतदेह बांगलादेशात आणण्यासाठी सिंगापूर सरकार बांगलादेश उच्चायुक्तांना मदत करत आहे.
ढाका : बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराने आता अत्यंत भीषण स्वरूप धारण केले असून, दंगलखोरांनी ...
कोण होते शरीफ उस्मान हादी?
हादी हे बांगलादेशातील 'जुलै क्रांती'चे प्रमुख नेते मानले जात होते, ज्या आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. ते 'ढाका-८' मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्यांच्यावर झालेला हा हल्ला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, "निवडणुकीत हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा दिला आहे.
भारतासाठी चिंतेची बाब आणि 'राजनैतिक' वाद
या हत्येच्या प्रयत्नावरून बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतावर गंभीर आरोप केले आहेत, ढाका सरकारने गेल्या आठवड्यात भारताच्या उच्चायुक्तांना बोलावून या प्रकरणात सहकार्य करण्याची मागणी केली. हल्लेखोर भारतीय सीमेत घुसण्याची शक्यता वर्तवत, बांगलादेशने भारताला त्यांना अटक करून स्वाधीन (Extradition) करण्याची विनंती केली आहे.
"स्वत:ची कायदा-सुव्यवस्था सांभाळा"; बांगलादेशच्या आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर
बांगलादेशातील कट्टरपंथी नेते आणि 'इंकलाब मंचा'चे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांच्यावरील हल्ल्याच्या संदर्भात बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केलेल्या आरोपांना भारताने अधिकृतपणे प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने १४ डिसेंबर २०२५ रोजी बांगलादेश सरकारने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकातील सर्व दावे आणि आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना स्पष्ट केले की, "बांगलादेशमध्ये मुक्त, न्याय्य, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या पाहिजेत, याच भूमिकेवर भारत ठाम आहे." शेजारील देशात लोकशाही प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी भारत नेहमीच आग्रही राहिला आहे.
राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. भारताने म्हटले आहे की, "भारताने आपली भूमी कधीही बांगलादेशातील जनतेच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही विघातक कृत्यासाठी वापरू दिली नाही." बांगलादेशने केलेले 'हल्लेखोर भारताकडे पळाले' किंवा 'भारताचा संबंध आहे' हे दावे भारताने फेटाळून लावले आहेत. उलट, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आपल्या देशातील अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलावीत, जेणेकरून शांततेत निवडणुका होऊ शकतील, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे. थोडक्यात, आपल्या देशातील हिंसेसाठी भारताकडे बोट दाखवण्यापेक्षा बांगलादेशने प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष केंद्रित करावे, असा सूचक सल्ला भारताने या निवेदनातून दिला आहे.





