Friday, December 19, 2025

Bangladesh Journalist Targeted : २८ पत्रकार, ९ वा मजला अन् गच्चीवर मृत्यूचं तांडव! दंगलखोर दरवाजा ठोकत होते, 'द डेली स्टार'मधील थरार...

Bangladesh Journalist Targeted : २८ पत्रकार, ९ वा मजला अन् गच्चीवर मृत्यूचं तांडव! दंगलखोर दरवाजा ठोकत होते, 'द डेली स्टार'मधील थरार...

ढाका : बांगलादेशातील विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचाराने आता अत्यंत भीषण स्वरूप धारण केले असून, दंगलखोरांनी आपला मोर्चा थेट माध्यमांच्या कार्यालयांकडे वळवला आहे. काल मध्यरात्री राजधानी ढाकामध्ये रक्ताळलेले नाट्य पाहायला मिळाले. आंदोलकांच्या एका मोठ्या जमावाने बांगलादेशातील अत्यंत नामांकित इंग्रजी वृत्तपत्र ‘द डेली स्टार’ (The Daily Star) च्या मुख्य कार्यालयाला आग लावली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी इमारतीच्या तळमजल्याला आग लावण्यात आली, त्यावेळी अनेक पत्रकार आणि कर्मचारी आतमध्ये काम करत होते. जीव वाचवण्यासाठी या पत्रकारांनी इमारतीच्या छताचा (गच्चीचा) आधार घेतला. तिथे सुमारे तीन तास हे पत्रकार मृत्यूच्या सावटाखाली अडकून पडले होते. धुराचे लोट आणि खाली असलेल्या संतप्त जमावामुळे बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते, हा अनुभव त्यांच्यासाठी मृत्यूला जवळून पाहण्यासारखा होता. या आगीत 'द डेली स्टार'चे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. केवळ 'द डेली स्टार'च नाही, तर बांगलादेशातील दुसरे आघाडीचे वर्तमानपत्र ‘प्रथम आलो’ (Prothom Alo) देखील दंगलखोरांच्या निशाण्यावर होते. कारवान बाजार परिसरातील त्यांच्या कार्यालयावर जमावाने हल्ला चढवून प्रचंड तोडफोड केली आणि त्यानंतर इमारतीला आग लावून दिली.

एका प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एका निनावी फोन कॉलद्वारे त्यांना सतर्क करण्यात आले होते की, जमाव कार्यालयाच्या दिशेने येत आहे. कर्मचाऱ्यांनी तातडीने इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत जमावाने तळमजल्याचा ताबा घेतला होता. 'बीडीन्यूज२४' या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या सविस्तर वृत्तानुसार, संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते आणि चहूबाजूंनी ओरडण्याचा आवाज येत होता. या अघोरी हल्ल्यामुळे बांगलादेशातील पत्रकारिता सध्या दहशतीखाली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा मोठा घाला असल्याचे मानले जात आहे.

कॅन्टीन कर्मचाऱ्याला जमावाने झोडपले

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

इमारतीच्या तळमजल्यावर लागलेल्या आगीमुळे आणि जमावाच्या हिंसक घोषणांमुळे सुमारे २८ पत्रकार आणि कर्मचाऱ्यांचा एक गट जीव वाचवण्यासाठी धावत ९ व्या मजल्यावरील गच्चीवर पोहोचला. चहुबाजूंनी धुराचे लोट येत असताना आणि खाली दंगलखोरांचा हैदोस सुरू असताना, या सर्वांनी स्वतःला गच्चीवर कोंडून घेतले होते. याच दरम्यान, इमारतीच्या कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याने अत्यंत धाडसाने 'फायर एस्केप' शिडीचा वापर करून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो खाली पोहोचताच क्रूर जमावाने त्याला पकडले आणि बेदम मारहाण सुरू केली. हा भीषण प्रकार गच्चीवरून पाहिल्यानंतर वर अडकलेल्या इतर पत्रकारांची पाचावर धारण बसली आणि त्यानंतर कोणीही खाली उतरण्याचे धाडस केले नाही. काही वेळाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तळमजल्यावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाचे चार जवान या अडकलेल्या पत्रकारांना वाचवण्यासाठी गच्चीवर पोहोचले, परंतु खाली सुरू असलेली तोडफोड आणि हिंसक जमाव पाहून पत्रकारांमध्ये इतकी दहशत होती की त्यांनी खाली येण्यास स्पष्ट नकार दिला. "बाहेर पडलो तर जमाव आपल्याला जिवंत सोडणार नाही," या भीतीपोटी या पत्रकारांना मदतीपेक्षा गच्चीवर थांबणेच अधिक सुरक्षित वाटले. गच्चीचा दरवाजा घट्ट बंद करून हे २८ जीव तासनतास मृत्यूच्या छायेत उभे होते. लोकशाहीचा आधार मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना आपल्याच देशात अशा प्रकारे जीव मुठीत धरून राहावे लागल्याने बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

शेवटच्या क्षणी 'फायर एक्झिट' ठरली देवदूत

इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्या २८ पत्रकारांना धीर देण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. "बाहेर सैन्य (Army) तैनात आहे, घाबरू नका," असे आश्वासन फायर फायटर्स देत होते, मात्र परिस्थिती या उलट होती. अग्निशमन दलाचे जवान आणि पत्रकार गच्चीवर असतानाच, काही हिंसक हल्लेखोर इमारतीच्या आतून गच्चीपर्यंत पोहोचले. त्यांनी गच्चीचा बंद दरवाजा जोरजोरात ठोकायला आणि तोडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. हा प्रकार इतका भीषण होता की, मदतीला आलेले अग्निशमन दलाचे जवानही घाबरले आणि त्यांना स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली. ज्या सैन्याच्या नावावर पत्रकार खाली यायला तयार होते, ते सैन्य तिथे पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर गच्चीच्या दारापर्यंत धडकल्याने एकच गोंधळ उडाला. मृत्यू समोर दिसत असताना अखेर अग्निशमन दलाने एक जोखमीचा निर्णय घेतला. मुख्य रस्त्यावर जमावाचा तांडव सुरू असल्याने, पत्रकारांना इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या 'फायर-एक्झिट' (Emergency Stairs) शिड्यांवरून खाली उतरवण्यात आले. अत्यंत सावधगिरीने आणि गुपचूप पद्धतीने या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीच्या मागच्या अरुंद गल्लीतून बाहेर काढण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >