विदर्भ, मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, ठाणे विभागातील पदाधिकारी उपस्थित...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री यांची बैठक आज अपेक्षित ;महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाण्याची शक्यता...
मुंबई - राज्यातील २९ महानगरपालिकेंच्या निवडणूका जाहीर झाल्या असून दिनांक २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशावेळी त्या - त्या जिल्ह्यासाठी नेमलेले समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासमवेत आढावा बैठक घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महिला आर्थिक विकास मंडळ सभागृहात पार पडलेल्या बैठकीत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पिंपरी - चिंचवड, पुणे, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई - ठाणे विभागातील कल्याण' डोंबिवली, ठाणे शहर, मिरा-भाईंदर, वसई - विरार या महानगर पालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत राजकीय परिस्थिती आणि महायुती म्हणून सामोरे जाताना नेमकी कोणती पाऊले उचलली गेली पाहिजेत व आतापर्यंत त्या- त्या महानगरपालिकेत मित्रपक्षांशी चर्चा झाली असेल याबाबतचा अहवाल घेतला असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
आज (शुक्रवारी) रात्री राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यावेळी चर्चा होईल. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनाही याची माहिती दिली जाईल आणि कदाचित आमची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक अपेक्षित आहे. ती बैठक झाली तर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांना महायुती म्हणून सामोरे जायचे यावर धोरण ठरवले जाईल असे स्पष्ट मत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.
महायुतीबाबत ठिकठिकाणी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतर भाजप प्रभारी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यामुळे या सर्व निवडणूका महायुती म्हणून सामोरे जाण्याचे धोरण ठरले जाईल असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
प्रत्येक महानगरपालिकानिहाय राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. ज्या ठिकाणी सत्ता आहे ते अधिक संख्याबळ मागणे हे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरुर असतात परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागत असतात. परंतु महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल आहे असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितले.






