जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांआधी राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधी या निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
याविरुद्ध कोर्टात अपील करता येणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत यावेळी मान्यता देण्यात आली.
यापूर्वी हा निर्णय नाकारला गेल्यास उमेदवार जिल्हा न्यायालयात अपील करण्याची मुभा होती. मात्र, वेगवेगळ्या कोर्टात अशी अपिले बराच वेळ प्रलंबित राहत असल्याने निवडणुका वेळेवर आणि ठरलेल्या वेळेत होऊ शकत नव्हत्या. त्यामुळे निवडणुका वेळेत पार पाडता याव्यात म्हणून हा बदल करण्यात आल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.