अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान
मुंबई : भारतीय संघाचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने आयसीसीच्या ताज्या ट्वेंटी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले स्थान आणखी बळकट केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील भेदक कामगिरीच्या जोरावर वरुणने कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग गुणांची कमाई केली असून, आता त्याला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शाहिद आफ्रिदीचा सर्वकालीन विक्रम खुणावत आहे.
वरुण चक्रवर्ती सध्या ८१८ रेटिंग गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याने दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या जेकब डफीविरुद्ध तब्बल ११९ गुणांची मोठी आघाडी घेतली आहे. या कामगिरीमुळे वरुण हा आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोत्तम रेटिंग गुण मिळवणाऱ्या अव्वल १० गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने यापूर्वीचा भारताचा जसप्रीत बुमराहचा २०१७ मधील ७८३ गुणांचा विक्रम मोडीत काढला आहे.
वरुणच्या या क्रमवारीत प्रगतीचे मुख्य कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची सध्याची मालिका. त्याने या मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात दोन विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. धरमशाला येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने केवळ ११ धावांत २ बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताने तो सामना ७ गडी राखून जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
सर्वाधिक गोलंदाज रेटिंग - पुरुषांची टी-२० आंतरराष्ट्रीय
- उमर गुल ( पाकिस्तान) - ८६५ रेटिंग
- सॅम्युअल बद्री ( वेस्ट इंडीज) - ८६४ रेटिंग
- डॅनिएल व्हिटोरी ( न्यूझीलंड ) - ८५८ रेटिंग
- सुनील नरीन ( वेस्ट इंडिज ) - ८३२ रेटींग
- रशाीद खान ( अफगाणिस्तान) - ८२८ रेटिंग
- तब्रेझ शम्सी ( द. आफ्रिका) - ८२७ रेटिंग
- शाहिद आफ्रिदी ( पाकिस्तान )- ८२२ रेटिंग
- वरुण चक्रवर्थी ( भारत ) - ८१८ रेटिंग
- शादाब खान ( पाकिस्तान ) - ८११ रेटिंग
- वनिंदू हसरंगा ( श्रीलंका) - ८०९ रेटिंग
आता लक्ष्य उमर गुलचा विक्रम
वरुणने सध्याच्या कामगिरीने पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानला मागे टाकले आहे. आता त्याचे पुढील लक्ष्य पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलच्या (८६५ गुण) सर्वकालीन सर्वोच्च रेटिंग विक्रमावर असेल. वरुणच्या फिरकीचा जादू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कायम राहिल्यास, लवकरच तो टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरू शकतो.