Thursday, December 18, 2025

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र शोककळा पसरली असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुतार यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडीयावर टाकली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली.

पुढे त्यांनी लिहिले आहे, रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला. अत्यंत बारकाईने केलेली कलाकुसर आणि त्यातील जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्टय होते. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही गेलो होतो, पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' या गीताच्या ओळी उच्चारल्या तेव्हा भारावून गेलो होतो.

अनेक शिल्पांना त्यांनी आकार दिला. स्टॅच्यु ऑफ यूनिटीमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा किंवा अंदमानमधील वीर सावरकर यांचा पुतळा. वयाच्या १००व्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. संसद भवन परिसरात सुद्धा त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे आहेत. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि ते प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशाप्रकारे फडणवीसांनी सुतारांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >