Thursday, December 18, 2025

भाषा महायुती-महा आघाडीची, तयारी स्वबळाची

भाषा महायुती-महा आघाडीची, तयारी स्वबळाची

वार्तापत्र : उत्तर महाराष्ट्र

धनंजय बोडके

निवडणूक आयोगाकडून नाशिकसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिक महापालिकेबाबत राजकीय पक्षांची भाषा आज जरी महायुती आणि महाविकास आघाडी होईल अशी असली, तरी कामकाज मात्र स्वबळाचे सुरू आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीऐवजी प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढेल, अशी जोरदार शक्यता पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुकांना मोठी प्रतीक्षा होती. प्रारंभी अनेक इच्छुकांनी प्रभागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले. काहींनी निवडणुका लांबल्याने उपक्रमांपासून दोन हात दूर राहणे पसंत केले. काही विद्यमान नगरसेवकांनीदेखील प्रभागात आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात ३१ जानेवारीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय आल्यानंतर इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगानेदेखील पहिल्या टप्प्यात नगर परिषदा, नगर पंचायत निवडणुका घेतल्या. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे नियोजन होते; परंतु ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यामुळे या निवडणुका न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. त्याऐवजी आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यातील सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रचारासाठी आणि उमेदवारी निवडीसाठी अत्यंत कमी कालावधी असल्याने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे.

आज जरी महाविकास आघाडी आणि महायुती होईल असे नेतेमंडळी बोलत असली, तरी काही पक्षांनी महापालिकेच्या सर्वच १२२ जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी पक्ष किंवा स्थानिक पातळीवर जो निर्णय होईल, त्यानुसार महाविकास आघाडी, महायुतीतून अथवा स्वबळावर उमेदवारी देण्यात येणार आहे. महायुती, महाविकास आघाडी किंवा स्वबळासाठी प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरू आहे. महायुतीतील भारतीय जनता पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आघाडी घेतली आहे. चार-पाच दिवसांत सर्वच १२२ जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या आहेत. हजारांहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील मुलाखतींना प्रारंभ केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उबाठा)आणि काँग्रेस यांनी अद्याप इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नसल्या, तरी बैठकांचा धडाका लावला आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. शिंदे सेनेनेदेखील महायुतीत स्थान द्यायचे असेल, तर नाशिक महापालिका निवडणुकीत किमान ४० जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष ४० जागा शिवसेनेला देईल, अशी शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. परिणामी महायुती होण्याची शक्यता धूसर झाली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (शिंदे सेना) आणि राष्ट्रवादी (अजित पवार), तसेच शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असे पाच पक्ष एकत्र येतील,अशी जोरदार चर्चा आहे. काही नेत्यांच्या बैठका देखील झाल्या आहेत. मात्र काय निर्णय होईल, यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आचारसंहिता लागण्याच्या काही तास अगोदर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले. सकाळपासूनच तीन-चार ठिकाणी साधू-संत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण करण्यात आले. रामकालपथ आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन करत, एक प्रकारे आचारसंहितेच्या काही तास अगोदर जोरदार शंखनाद फुंकण्यात आला. वृक्षप्रेमींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नदेखील या वृक्षारोपण कार्यक्रमातून दिसून येतो. पंधरा हजारांपैकी २ हजार झाडे लावण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने १५ हजार, किंबहुना ५० हजारांपर्यंत झाडे लावण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने जाहीर कार्यक्रमात व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक आणखी हरित होईल, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू या. बरोबर एक महिन्यानंतर महापालिका लोकनियुक्त सत्ताधाऱ्यांच्या हाती जातील. मात्र तत्पूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोठा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दीड वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने, त्यानिमित्ताने सुमारे २५ हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या गर्दीत आणखी भर पडली आहे.

Comments
Add Comment