नवी दिल्ली: शेकडो शिल्पांना आकार देऊन जगासमोर शिल्पकलेचा आदर्श ठेवणारे जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार काळाच्या पडद्याआड गेले आहेत. यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी आयुष्याची शताब्दी साजरी केली असून वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर आज (१८ डिसेंबर) सकाळी ११ वाजता नोएडा येथे अंत्यसंस्कार आणि अंतिम विधी होतील, तर नोएडाच्या ए२ सेक्टर १९ ते सेक्टर ९४ या मार्गावर त्यांची अंत्ययात्रा निघेल अशी माहिती त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी दिली आहे.
स्टॅच्यु ऑफ युनिटीला दिला आकार देशभरात राम सुतार यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश आहे. सुतार यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या ६० वर्षांत २००हून अधिक भव्य शिल्प तयार केली. सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचेही शिल्प राम सुतार यांनी तयार केली आहेत. त्यांनी आपल्या हाताने विदेशातील महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडविले आहेत. संसदेसमोरील महात्मा गांधींचा कांस्य आणि पाषणातील पुतळाही त्यांनी घडविला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे जगभरात भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीके म्हणून उभे राहिलेले आहेत.
'पद्मभूषण' आणि 'पद्मश्री'ने सन्मानित कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व राम सुतार यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा २०२४ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दगड आणि संगमरवरी शिल्पकलेवर प्रभुत्व राम सुतार यांचा जन्म १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे सुतार कुटुंबात झाला होता. बालपण अत्यंत कठीण संघर्षात जात असताना त्यांच्यामधील प्रतिभा त्यांचे गुरुजी श्रीराम जोशी यांनी हेरली. त्यांच्यामधील उद्योन्मुख कलाकार घडविण्यासाठी श्रीराम जोशी यांनी राम यांना मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले. जेजेमधून शिक्षण घेत असताना त्यांच्या उपजत असलेल्या प्रतिभेचा अधिक विकास झाला. राम सुतार यांनी जेजे स्कूलमध्ये सातत्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत असताना अभ्यासक्रमाच्या शेवटी त्यांनी मॉडेलिंगसाठी प्रतिष्ठित असे मेयो सुवर्णपदक मिळविले.
सरकारी नोकरी सोडून धरली स्वतंत्र व्यवसायाची वाट छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्यांचे पुनर्जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून १९५० मध्ये महत्त्वाचे काम करण्यात आले. त्यावेळी सुतारांनी मॉडेलर म्हणून अनेक शिल्पांना गतवैभव मिळवून देण्यासाठी काम केले. यानंतर १९५९मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय प्रदर्शन विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र, शिल्पकलेची जास्त आवड असल्याने त्यांनी नोकरी सोडून यामध्येच स्वतंत्र व्यवसाय करणे पसंत केले.
पंडित नेहरुंनीदेखील केले होते कौतुक गांधी सागर धरणावरील चंबळ स्मारक हे सुतारांनी केलेले काम खूप चर्चेत आले होते. काँक्रीटच्या एकाच ठोकळ्यातून कोरलेली ४५ फूट उंच भव्य मूर्ती ही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बंधुत्वाचे प्रतिक मानले जाते. या मूर्तीमध्ये एक माता दोन मुलांसह असल्याचे कोरीव काम पाहून तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरुदेखील खूश झाले होते.
'आनंदवन'मध्ये आहे शिल्प उद्यान महात्मा गांधींचा भव्य आकाराचा अर्धपुतळा ही त्यांच्या सुप्रसिद्ध कलाकृतींपैकी एक आहे. महात्मा गांधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने भारत सरकारने रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बार्बाडोस आणि काराकास यांसारख्या देशांना महात्मा गांधींचे अर्धपुतळे भेट म्हणून दिले आहेत. हे पुतळे राम सुतार यांनी घडविलेले आहेत.
नोएडा येथील राम सुतार यांचा स्टुडिओ संग्रहालयासारखा भव्य आहे. तिथे अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भव्य प्रतिकृती तसेच अनेक मॉडेल्स मोठ्या संख्येने आहेत. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी वडिलांच्या कलाकृती एकत्र प्रदर्शित करून 'आनंदवन' नावाचे एक विस्तीर्ण शिल्प उद्यान विकसित केले आहे. हे भारतामधील अनोखे कलादालन सूरजकुंड-भडखल तलाव रस्त्यावर स्थित आहे.






