ठाणे : मुंबई महापालिकेने शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसोबतच त्याच्या समांतर दोन पदरी नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा पूल उभारण्यात आल्यास ठाणे ते सीएसएमटी दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव उड्डाणपूल पूर्व–पश्चिम दिशेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असून सध्या त्याची पुनर्बांधणी महापालिकेकडून सुरू आहे. हा पूल मूळतः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधला होता. सध्या या पुलावर ‘दोन अधिक एक’ अशी वाहतूक व्यवस्था असून ठाणे व पूर्व उपनगरांकडे जाण्यासाठी दोन मार्ग, तर दक्षिण मुंबईतील सीएसएमटीकडे जाण्यासाठी एक मार्ग उपलब्ध आहे. मात्र वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने गर्दीच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
ही समस्या दूर करण्यासाठी शीव उड्डाणपुलाच्या समांतर स्वतंत्र दोन पदरी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या नव्या पुलामुळे ठाणे ते सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी थेट पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून विद्यमान पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईल.
नवीन उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर इंधनाची बचत होऊन वाहनचालकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. या पुलाची आवश्यकता असल्याचे मत वाहतूक पोलिसांनीही नोंदवले आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १५५ कोटी २ लाख ३७ हजार रुपये इतका आहे.
कंत्राटदार नियुक्तीबाबत निर्णय
महालक्ष्मी परिसरातील काही उड्डाणपूल विस्तारकामे एका कंत्राटदाराला देण्यात आली होती. मात्र वाहतूक आणि सह पोलिस आयुक्तांनी या कामांसाठी ना हरकत प्रमाणपत्र नाकारले होते. संबंधित ठिकाणी पूल आवश्यक नसल्याचे नमूद करण्यात आले असून अतिक्रमणेही हटवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. भविष्यात कंत्राटदाराकडून अतिरिक्त खर्चाची मागणी होऊ नये, यासाठी नवीन शीव उड्डाणपुलाचे काम त्याच कंत्राटदाराला देण्याचा विचार महापालिकेकडून केला जात आहे.
उड्डाणपुलाच्या कामाला गती
शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या वेगात सुरू असून हे काम २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सध्या रेल्वे हद्दीतील कामे, रेल्वे पुलावरील उत्तर दिशेच्या अर्ध्या भागावर गर्डर बसवणे, पोहोच मार्गांचे बांधकाम तसेच दोन पादचारी भुयारी मार्गांचे काम सुरू आहे. गर्डर बसवण्याचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यानंतर रेल्वे हद्दीतील उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत.






