गेल्या काही वर्षांपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेने क्रिकेट विश्वात एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले. प्रीमिअर लीग केवळ भारतातच खेळली जाते, अशातला भाग नाही. पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजसह अन्य देशांतही प्रीमिअर लीग खेळवली जात आहे. पण, भारत आणि क्रिकेटचे एक आगळेवेगळे नाते असल्याने अन्य देशांच्या तुलनेत भारतातील आयपीएल स्पर्धेला एक वलय आहे. अर्थात हे वलय खेळामुळे कमी, पण त्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांमुळे जास्त प्राप्त झाले आहे, हे सत्य आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने केली, जी एक व्यावसायिक टी-२० क्रिकेट लीग आहे, ज्यात जगभरातील खेळाडू खेळतात. राजस्थान रॉयल्सने पहिले विजेतेपद जिंकले आणि आता मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स हे प्रत्येकी पाच वेळा विजेते ठरले आहेत. संघात बदल, संघांची वाढ आणि ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’चे 'दिल्ली कॅपिटल्स'मध्ये नामकरण यांसारख्या अनेक घडामोडी घडल्या आहेत, ज्यामुळे ही जगातील सर्वात लोकप्रिय लीग बनली आहे. २००७ मध्ये बीसीसीआयने ललित मोदी यांच्या नेतृत्वाखाली या लीगची स्थापना केली. २००८ साली झालेल्या पहिल्या स्पर्धेत ८ संघांनी भाग घेतला. राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली पहिले विजेतेपद जिंकले.
१८ एप्रिल २००८ रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात स्पर्धेतील पहिला सामना झाला. २०११ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया आणि कोची टस्कर्स केरळ हे संघ जोडले गेले. डेक्कन चार्जर्स (२०१२ मध्ये बंद) आणि कोची टस्कर्स केरळ (२०११ नंतर) या संघांची जागा अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद (२०१३) आणि इतर संघांनी घेतली. २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स २ वर्षांसाठी निलंबित (२०१६-२०१७) झाले, त्यामुळे रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स हे तात्पुरते संघ आले. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नाव २०१९ मध्ये 'दिल्ली कॅपिटल्स' आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे नाव २०२१ मध्ये 'पंजाब किंग्स' असे बदलले. २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांचा समावेश झाल्याने ही १० संघांची स्पर्धा बनली. ही स्पर्धा कोलकाता नाईट रायडर्सने ३ वेळा, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (२०२५ मध्ये) यांनी प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे. या आयपीएलच्या २०२६च्या स्पर्धेसाठीचा लिलाव मंगळवारी पार पडला. या लिलावात केवळ आंतरराष्ट्रीय तारेच नाही, तर अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनीही सर्वांचे लक्ष वेधले. कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला २५ कोटी रुपयांना खरेदी केले. तो सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. आयपीएलमधील संघमालक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावतात. अर्थात ही बोली खेळाडूंच्या खेळावर अवलंबून असते. ही बोली दहा लाखांपासून २५ कोटींपर्यंतही गेल्याचे या आयपीएल लिलावात पाहावयास मिळाले. या स्पर्धेतून भारतालाही चांगले क्रिकेटपटू मिळाले आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंचाही भारताला परिचय झाला. त्या खेळाडूंना वनडे, टी-२० तसेच रणजी स्पर्धांचीही दालने उपलब्ध झाली. कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुर रहमान ९ कोटी, तेजस्वी सिंह दहिया ३ कोटी, रचिन रवींद्र २ कोटी, आकाशदीप १ कोटींची बोली लावली. चेन्नई सुपर किंग्जने प्रशांत वीर १४ कोटी, कार्तिक शर्मा १४ कोटी, मॅट हेन्री २ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघाने व्यंकटेश अय्यर ७ कोटी, मंगेश यादव ५ कोटी, जेकब डफी २ कोटी, मुंबई इंडियन्स संघाने क्विंटन डी कॉक १ कोटी, दिल्ली कॅपिटल्स संघाने आकिब नबी डार ८ कोटी, पथुम निसांका ४ कोटी, डेव्हिड मिलर २ कोटी, बेन डकेट २ कोटी तर लुंगी एनगिडी २ कोटी अशी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली. अन्य कोट्यवधी रुपयांच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादच्या लियाम लिविंगस्टोन १३ कोटी, जॅक एडवर्ड्स ३ कोटी, लखनऊ सुपर जायंट्सच्या जोश इंग्लिस ८ कोटी, अनरिक नॉर्खिया २ कोटी, वानिंदू हसरंगा २ कोटी, राजस्थान रॉयल्सच्या रवी बिश्नोई ७ कोटी, ॲडम मिल्ने २ कोटी, पंजाब किंग्सच्या बेन ड्वारशियस ४ कोटी, गुजरात टायटन्सच्या जेसन होल्डर ७ कोटी, टॉम बँटन २ कोटी यांचा समावेश आहे.
कोट्यवधी रुपयांची बोली लावून विकत घेतलेले खेळाडू हाही एक प्रकारचा जुगार आहे. अनेकदा करोडो रुपये खर्चून खरेदी केलेले खेळाडू फ्लॉप ठरतात, तर काही लाखांमध्ये खरेदी केलेले खेळाडू स्पर्धा गाजवून जातात. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले जातात. अनेक फलंदाज शतकी खेळीने नावारूपाला येतात. अर्थात आयपीएल गाजविणारे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धा, कसोटी, एकदिवसीय सामने, टी-२० सामन्यांमध्ये फ्लॉप ठरतात. क्रिकेट खेळाचा खरा कस हा कसोटी सामन्यांमध्ये लागतो. दिवसाला ९० षटकांप्रमाणे पाच दिवस खेळून काढायचे असतात. एकदिवसीय सामन्यांमध्ये शंभर षटके मैदानावर उभे राहायचे असते. त्यामुळे आयपीएल गाजविणाऱ्यांचा खेळ कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये फिका पडतो. टी-२० सामन्यांच्या अतिरेकामुळे कसोटी सामने अलीकडच्या काळात अडीच ते तीन दिवसांमध्ये निकाली लागतात. अर्थात टी-२०च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे व आयपीएल स्पर्धेमुळे अनेक खेळाडू नावारूपाला आलेत. आयपीएल २०२६च्या रणसंग्रामासाठी संघ ठरले आहेत. संघामधील सरदारांचीही आता निवड झाली, अर्थात त्यासाठी संघमालकांना लिलावादरम्यान आपली तिजोरी रिती करावी लागली. स्पर्धेदरम्यानच कोणाचा पैसा चालला, कोणाचा वाया गेला हे त्या त्या खेळाडूंच्या खेळावरुनच स्पष्ट होणार आहे.






