"राजीव सातव अमर रहे"च्या घोषणा अन् आजच 'कमळ' हाती घेणार?
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज (१८ डिसेंबर) आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सोपवला असून, त्या आजच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अंतर्गत गटबाजी ठरली कारणीभूत? गेल्या काही काळापासून प्रज्ञा सातव या पक्षांतर्गत असलेल्या प्रचंड गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा होती. हिंगोली आणि प्रदेश पातळीवर त्यांना डावलले जात असल्याच्या तक्रारी त्यांनी यापूर्वी केल्या होत्या. याच नाराजीतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आज दुपारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता असून, यामुळे काँग्रेसमधील 'राजीव सातव' यांच्या कट्टर समर्थकांमध्ये मोठी चलबिचल सुरू झाली आहे. राहुल गांधींसाठी मोठा धक्का दिवंगत राजीव सातव हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी होते. त्यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, आता सातव यांच्याच पत्नीने काँग्रेसची साथ सोडल्यामुळे गांधी परिवारासाठी हा मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे. सतेज पाटील यांचा दावा फोल ठरणार? दुसरीकडे, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी या पक्षप्रवेशाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते. मात्र, आज प्रत्यक्ष राजीनामा सादर झाल्यामुळे सतेज पाटील यांचा दावा फोल ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.
राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले असतानाच, भाजपचे ...
काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना समर्थकांचा मोठा फौजफाटा
आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, मात्र हा राजीनामा देताना त्यांनी केलेले शक्तीप्रदर्शन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारे ठरले. केवळ कागदोपत्री राजीनामा न देता, आपल्या समर्थकांच्या अफाट गर्दीसह प्रज्ञा सातव विधीमंडळ सचिवांच्या दालनात पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत हिंगोली जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला. प्रज्ञा सातव राजीनामा देण्यासाठी आल्या असताना त्यांच्या समर्थकांनी "राजीव सातव अमर रहे" अशा जोरदार घोषणा दिल्या. काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असतानाही कार्यकर्त्यांनी स्वर्गीय राजीव सातव यांच्या नावाचा जयघोष केल्याने एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. "प्रज्ञा सातव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. राजीनाम्याच्या वेळी कार्यकर्त्यांनी केलेले हे शक्तीप्रदर्शन म्हणजे प्रज्ञा सातव यांनी भाजपमधील आपल्या नव्या इनिंगची केलेली दमदार सुरुवात मानली जात आहे. हिंगोलीत राजीव सातव यांचा मानणारा मोठा वर्ग आहे, हा वर्ग आता भाजपच्या गोटात सामील झाल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचा मराठवाड्यातील मोठा चेहरा म्हणून डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आजच्या त्यांच्या निर्णयामुळे सातव कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात आले आहे. डॉ. प्रज्ञा सातव या केवळ राजीव सातव यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर एक सुशिक्षित आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी पक्षाने प्रज्ञा सातव यांना संधी दिली आणि त्या बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून आल्या. पहिल्या कार्यकाळानंतर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या आमदार बनल्या. त्यांचा सध्याचा कार्यकाळ २०२४ ते २०३० असा तब्बल सहा वर्षांचा होता. मात्र, आमदारकीचे अजून ५-६ वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत होत्या. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी हिंगोली आणि मराठवाड्यात पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत कुरघोडी आणि गटबाजीमुळे त्या अस्वस्थ होत्या. अखेर आजच्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील औपचारिक प्रवास थांबला असून, आता त्या भाजपच्या माध्यमातून नवी राजकीय इनिंग सुरू करण्यास सज्ज झाल्या आहेत.





