Thursday, December 18, 2025

Pradnya Satav : 'राजीवभाऊंचे आशीर्वाद अन् देवाभाऊंची साथ'; प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं भरभरून कौतुक

Pradnya Satav : 'राजीवभाऊंचे आशीर्वाद अन् देवाभाऊंची साथ'; प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं भरभरून कौतुक
मुंबई : गेल्या २४ तासांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. "स्वर्गीय राजीव सातव यांचे हिंगोलीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे," असे स्पष्ट प्रतिपादन प्रज्ञा सातव यांनी यावेळी केले. आज सकाळी त्यांनी विधीमंडळ सचिवांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सोपवला आणि त्यानंतर रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसला सोडचिठ्ठी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस का सोडली? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी 'विकास' हाच मुख्य मुद्दा असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचा जो चौफेर विकास सुरू आहे, त्याला अधिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांची मोठी फळी हिंगोलीत सक्रिय आहे, ती आता प्रज्ञा सातव यांच्या रूपाने भाजपशी जोडली गेली आहे. हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ हिंगोलीतील काँग्रेसचे मोठे नेतृत्व म्हणून प्रज्ञा सातव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्यांनी आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक असतानाच राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. "केवळ राजकारण म्हणून नव्हे, तर हिंगोलीच्या जनतेच्या हितासाठी मी हा धाडसी निर्णय घेतला आहे," असे सांगत त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची दिशा स्पष्ट केली.

प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केल्या जुन्या आठवणी अन् कार्यकर्त्यांचे मानले आभार

"भाजपच्या विशाल परिवारात मला आणि माझ्या हजारो कार्यकर्त्यांना सन्मानाने सामावून घेतल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानते," अशा शब्दांत त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सातव कुटुंबाचा सेवेचा वारसा प्रज्ञा सातव यांनी आपल्या भाषणात दिवंगत खासदार राजीव सातव आणि त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या म्हणाल्या, "राजीवजी हे हिंगोलीचे सुपुत्र होते. त्यांनी आणि रजनीताईंनी आपले संपूर्ण आयुष्य हिंगोलीच्या विकासासाठी अर्पण केले. गेल्या २० वर्षांपासून मी देखील त्यांच्या सोबत राहून एनजीओ आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होते. सातव कुटुंबाने नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले असून, तोच वारसा आता मी भाजपमध्ये पुढे नेणार आहे." कार्यकर्त्यांच्या बळावर नवा प्रवास २०२१ मध्ये विधीमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. विशेषतः आपल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "आज मी ज्या ठिकाणी उभी आहे, त्यात माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच आग्रहाखातर आणि हिंगोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे."

"राजीवभाऊंचे आशीर्वाद अन् देवाभाऊंची साथ!"

"राजीवभाऊंचे आशीर्वाद आणि देवाभाऊंची (देवेंद्र फडणवीस) साथ, सर्वजण मिळून करू संकटांवर मात!" अशा शब्दांत डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमधील आपल्या नव्या राजकीय वाटचालीचा संकल्प व्यक्त केला. केवळ पदासाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या चौफेर विकास प्रक्रियेत सक्रिय वाटा उचलण्यासाठी आपण भाजपमध्ये सामील झाल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. कार्यकर्त्यांचा कौल आणि 'देवाभाऊंचे' नेतृत्व प्रज्ञा सातव यांनी आपल्या भाषणात भाजप प्रवेशाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या आग्रहाला दिले. त्या म्हणाल्या की, "माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की, आपण अशा नेतृत्वाखाली काम करावे जिथे राज्याचा विकास केंद्रस्थानी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे आणि त्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे." पंतप्रधानांच्या 'सबका साथ' मंत्राचा स्वीकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा उल्लेख करत प्रज्ञा सातव यांनी भविष्यातील कामाची दिशा स्पष्ट केली. "मी आणि माझे कार्यकर्ते यापुढे 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास' या तत्त्वाने काम करत राहू. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे ध्येय असेल," असे आश्वासन त्यांनी भाजप नेत्यांना आणि जनतेला दिले. राजकीय वलय आणि विकासाची सांगड राजीव सातव यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आता भाजपच्या ताकदीची साथ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रज्ञा सातव यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे हिंगोली आणि मराठवाड्यात भाजपच्या विस्ताराला नवी गती मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >