Thursday, December 18, 2025

मुंबई पालिका निवडणुकीसाठी १५० जागांवर महायुतीचे एकमत

मुंबई पालिका निवडणुकीसाठी १५० जागांवर महायुतीचे एकमत

अमित साटम यांची माहिती; नवाब मलिकांऐवजी अन्य कोणाकडे नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादीचे महायुतीत स्वागत

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या जागावाटपासाठी भाजप आणि शिवसेनेतील दुसऱ्या बैठकीत १५० जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांवर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी दिली. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे हाच महायुतीचा मुख्य फॉर्म्युला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दादर येथील भाजपच्या 'वसंत स्मृती' कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर उपस्थित होते. तर, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, खासदार मिलिंद देवरा, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अमित साटम म्हणाले, "१५० जागांवर आमचे पूर्ण एकमत झाले आहे. उर्वरित ७७ जागांवर येत्या दोन-चार दिवसांत चर्चा पूर्ण करून अंतिम निर्णय घेतला जाईल. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील." जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत ते म्हणाले, "कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही. महायुती म्हणून २२७ जागा लढवून १५० पेक्षा अधिक जागा जिंकणे आणि मुंबईला भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख प्रशासन देणे हा आमचा उद्देश आहे. गेल्या २५ वर्षांत मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकवणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे."

उमेदवारांबाबत अद्याप चर्चा नाही

साटम पुढे म्हणाले, "महायुतीचा महापौर मुंबईकरांचा महापौर असेल. मुंबईचा विकास सातत्याने सुरू ठेवणे, शहराची सुरक्षितता अबाधित राखणे आणि मतांच्या राजकारणासाठी शहराचा रंग बदलण्याच्या प्रयत्नांना आळा घालणे यावर आमचे एकमत आहे." या बैठकीत उमेदवार निवडीबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचे साटम यांनी स्पष्ट केले. महायुतीत रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) समावेश असून, सर्व २२७ जागा एकत्र लढवण्यावर भर दिला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

अनिर्णित जागांवर फडणवीस-शिंदे निर्णय घेतील : उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, आजच्या बैठकीत १५० जागांबाबत चर्चा झाली. ७७ अनिर्णित जागांबाबत एक-दोन दिवसांत चर्चा होईल. कोण किती जागा लढतो, यापेक्षा महायुती म्हणून आम्ही पुढे जात आहोत. १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निश्चिय आम्ही केला आहे. तिकिट वाटप जाहीर होईल, तेव्हा कोणाला किती जागा मिळाल्या, हे तुम्हाला कळेल. अनिर्णित राहिलेल्या जागांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.

नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी संबंध नाही – अमित साटम

दरम्यान, महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण दिले नव्हते का, असा प्रश्न विचारला असता अमित साटम म्हणाले, "नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचे काही देणघेणे नाही, अशी आमची भूमिका आहे. मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. मुंबईसाठी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक आहेत, राष्ट्रवादीने मलिक यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करु इच्छित नाही. उद्या राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून दुसऱ्या कोणा नेत्यावर मुंबईची जबाबदारी दिली तर त्यांचे स्वागत आहे", अशी भूमिका साटम यांनी मांडली

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >