Thursday, December 18, 2025

वरळी सी लिंक वर २५० च्या स्पीडने पळवली लंबोर्गिनी; पोलिसांनी घडवली अद्दल

वरळी सी लिंक वर २५० च्या स्पीडने पळवली लंबोर्गिनी; पोलिसांनी घडवली अद्दल

मुंबई : मुंबईतील वांद्रे–वरळी सी लिंकवर भरधाव वेगात आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने लॅम्बोर्गिनी उरूस चालवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची ही आलिशान कार जप्त केली आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत स्टंटबाजी करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

बुधवारी घडलेल्या या घटनेत सी लिंकसारख्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी इतर वाहनांना ओव्हरटेक करत भरधाव वेगात जाताना स्पष्टपणे दिसत आहे. या मार्गावर ताशी ८० किलोमीटरची वेगमर्यादा असताना, कार अत्यंत वेगाने चालवली जात असल्याचे व्हिडीओतून स्पष्ट झाले.

व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली. फैज अदनवाला (वय ३६) या मुंबईत खारमध्ये राहणाऱ्या कार डीलरने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. प्राथमिक चौकशीत त्याने सोशल मीडियासाठी व्हिडीओ शूट करताना कार भरधाव चालवल्याची कबुली दिली.

वांद्रे–वरळी सी लिंकसारख्या महत्त्वाच्या पुलावर अशा प्रकारे बेदरकार वाहन चालवणे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >