Thursday, December 18, 2025

नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू

नवी मुंबईतील महत्त्वाचा बस डेपो अखेर ६ वर्षांनंतर सुरू

१९० कोटींचा खर्च, २१ मजली भव्य बांधकाम

नवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाशी येथील महत्त्वाचा बस डेपो अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.गेल्या सहा वर्षांपासून या बस डेपोचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचे काम सुरू होते.अखेर १६ डिसेंबर रोजी वाशी बस डेपो कार्यान्वित करण्यात आला असून,या डेपोमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि बदल करण्यात आले आहेत.१९० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या २१ मजली डेपोचे काम दीड वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते.राजकीय नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे उद्घाटने पुढे ढकलली जात होती,मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

१८ महिन्यांपूर्वी बांधकाम पूर्ण

अखेर सोमवार संध्याकाळपासून हा डेपो कार्यान्वित करण्यात आला आहे.या दीर्घ विलंबाच्या काळात जुने बस स्थानक पाडण्यात आले होते.त्यामुळे प्रवाशांना वाशी–कोपर खैरणे या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरूनच बस पकडाव्या लागत होत्या. यामुळे वाहतुकीचा धोका, तसेच ऊन-पावसाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पनवेल आणि वाशी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या बसेस या नव्या वाशी बस डेपोमध्ये थांबतील.मात्र ठाणे आणि घनसोलीकडून येणाऱ्या बसेस विश्णुदास भावे प्रेक्षागृहाच्या दिशेने वळवण्यात येणार असून, त्या बसेसना वाशी बस डेपोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

या प्रकल्पाची सुरुवात २०१८ साली १४० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकासह झाली होती.मात्र कालांतराने खर्च वाढत गेला आणि अंतिम खर्च १९० कोटी रुपयांवर पोहोचला.वाशी येथील जुन्या बस डेपोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या या २१ मजली इमारतीसाठी तीन वेळा पूर्णत्वाच्या मुदती वाढवाव्या लागल्या.ऑक्टोबर २०१९ मध्ये हा बस डेपो पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

वैशिष्ट्ये काय?

या भव्य इमारतीत खालचा पाच मजली भाग आणि वरचा १६ मजली भाग आहे. एकूण जागेपैकी सुमारे ७५ टक्के क्षेत्र बस वाहतुकीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.उर्वरित व्यावसायिक भागात रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल तसेच कार्यालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक रचनेचा आणि बहुपयोगी सुविधांनी सुसज्ज असा हा वाशी बस डेपो नवी मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >