Wednesday, January 28, 2026

भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावात अंबेश कुमार या तरुणाने आपली आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या चौकशीत अंबेश कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने प्रथम आईची हत्या केल्यानंतर वडिलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील श्यामलाल हे रेल्वेचे निवृत्त लोको पायलट होते. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंबेश आणि त्याच्या वडिलांमध्ये पैशाच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातूनच अंबेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरून ते आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवले. घरातील रक्ताचे डाग साफ करून आणि कपडे धुऊन त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो गाडीतून निघून गेला. वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकण्यात आले, तर आईच्या मृतदेहाचे तुकडे जलालापूर परिसरातील साई नदीत टाकण्यात आले. नदीत मृतदेहाचे अवयव आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.

पोलिस तपासात कौटुंबिक वादाचा आणखी एक धागा समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अंबेश कुमारने कोलकातामधील सहजिया नावाच्या महिलेशी विवाह केला होता. ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. मात्र कुटुंबीय या विवाहास विरोध करत होते आणि अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. घटस्फोटासाठी पैशांच्या मागणीवरून घरात सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने जौनपूरसह संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.

Comments
Add Comment